अशोक चव्हाण यांना विश्वास

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात २००९च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश मिळाले होते त्याचीच पुनरावृत्ती आगामी निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केला. गतवेळच्या तुलनेत राष्ट्रवादीबरोबरील जागावाटपात फार काही फरक पडणार नाही, असेही त्यांनी सूचित केले.

चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाले होते तर लोकसभेत आघाडीचे सर्वाधिक २६ खासदार निवडून आले होते. भाजप सरकारच्या विरोधातील वातावरण लक्षात घेता २०१९मध्येही काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षांच्या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच आघाडीची घोषणा केली जाईल. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबरोबर यावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. ‘एमआयएम’ने राज्यात लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केल्याने आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यात अडथळा येणार नाही. अर्थात, आघाडीचा निर्णय आंबेडकर यांनी घ्यायचा आहे. जागावाटपात आंबेडकर यांच्या पक्षाला जास्त जागा सोडल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी सूतोवाच केले.

राष्ट्रवादीबरोबरील चर्चा सकारात्मक झाली आहे. राहुल गांधी आणि शरद पवार या दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांमध्येच चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील आघाडी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. आघाडीत मोठा भाऊ कोण हे जनताच ठरवेल असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत सुरू असलेल्या संभ्रमाकडे लक्ष वेधले असता चव्हाण यांनी, शिवसेनेला भाजपची अधिक गरज असल्याचे अधोरेखित केले. स्वतंत्रपणे लढल्यास शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, असाही अंदाज व्यक्त केला.

राज्यात लोकसभेबरोबर विधानसभेची एकत्रित निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकणे कठीण आहे. यामुळेच बहुधा मोदी यांच्या करिश्म्याचा भाजप फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल.

एकत्रित निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांत फडणवीस सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘आदर्श’ हा अपघातच !

आगामी लोकसभा की विधानसभेची निवडणूक लढवायची याचा निर्णय पक्ष घेईल. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्यास लोकसभाही लढविण्याची आपली तयारी आहे. याचा निर्णय पक्षावर सोडल्याचेही अशोकरावांनी स्पष्ट केले. ‘आदर्श’ प्रकरण हा एक प्रकारे अपघात होता. त्यातून गेल्या आठ वर्षांत आपण बरेच काही शिकल्याची कबुलीही त्यांनी दिली. या साऱ्यातून बाहेर पडेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.