राज्यात गेल्या महिनाभरात झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले तरी दोन्ही पक्षांना आघाडी मिळाली आहे. याउलट भाजप-शिवसेना मागेच पडली आहे.
रविवारी झालेल्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी दोन नगरपालिकांमध्ये सत्ता मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि नगरमधील श्रीगोंदा या दोन पालिकांमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. काँग्रेसला सिल्लोडमध्ये २६ पैकी २२ जागा मिळाल्या असून, रिसोडमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. ब्रम्हपुरी आणि महादुला या दोन पालिकांमध्ये भाजपला सत्ता मिळाली.गेल्या महिन्यात झालेल्या नंदुरबार, धुळे आणि वाशिम जिल्हा परिषदांची सत्ता काँग्रेसला मिळाली. नगर आणि धुळे महापालिकांची सत्ता राष्ट्रवादीला मिळाली. अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. रविवारी झालेल्या सहा पालिकांमध्ये एकूण जागांच्या निम्म्या जागा आघाडीला मिळाल्या. यावरून चार राज्यांच्या विधानसभा निकालांनंतरही महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही आघाडीच पुढे असल्याचे सिद्ध झाले आहे, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे जास्त व्यवहार हे सुरत शहराशी होतात. या जिल्हा परिषदेतील एकूण ५३ सदस्य हे आघाडीचे निवडून आले आहेत. धुळे जिल्हा हा मध्य प्रदेशला लागून आहे. पण तेथेही काँग्रेसला सत्ता मिळाली याकडे पवार यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील मतदार हे आघाडीच्याच बाजूने असल्याचे  स्पष्ट होते, असेही पवार यांचे म्हणणे आहे.
एकूण १२४ जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी सर्वाधिक ४२ जागा काँग्रेसला मिळाल्या. भाजप (३२), राष्ट्रवादी (२६), शिवसेना (७), मनसे (एक), अपक्ष (३) तर आघाडय़ांचे १३ जण निवडून आले आहेत.