टोलच्या विरोधातील राज ठाकरे यांच्या आंदोलनाची हवा होईल, अशी पद्धतशीर खेळी सत्ताधारी खेळले, तर होऊन अटक झाल्याने राज यांच्यावर प्रसिद्धीचा झोत राहिले. उभय बाजूंच्या या उद्दिष्टपूर्तीमुळे दोघांचाही राजकीय हेतू बुधवारच्या आंदोलनातून सफल झाला. राज ठाकरे यांना शक्ती द्या, असा सूचक संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच झालेल्या बैठकीत दिला होता, असे समजते. तो पाळला गेल्याचेही मानले जात आहे.  
भाजप-शिवसेना युतीला शह देण्याकरिता राज ठाकरे यांचा पद्धतशीरपणे वापर करून घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना आहे. २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदरही सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने हीच खेळी केली होती. राज ठाकरे मोठे व्हावेत याची खबरदारी घेण्यात आली. याचा राजकीय लाभ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला होता. याचीच पुनरावृत्ती २०१४ च्या निवडणुकीत व्हावी, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
टोल विरोधी आंदोलनाची हवा तयार झाली पाहिजे यावर सत्ताधाऱ्यांचा भर होता. यामुळेच राज ठाकरे यांना घराबाहेर पडू देण्यात आले. अन्यथा राज यांना घराबाहेर पडतानाच स्थानबद्ध करण्यात आले असते. पण आंदोलन होत आहे, असा संदेश बाहेर गेला पाहिजे या हेतूनेच त्यांना दादरच्या पुढे जाऊ देण्यात आले. पुढे त्यांची गाडी अडवून अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी काहीही नाटय़मय घटना घडली नाही किंवा पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला नाही. आंदोलनाच्या काळात सुमारे दोन तास मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह राज्याच्या काही भागात मनसेची हवा तयार झाली. राज यांना अटक होताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. मात्र या आंदोलनात पोलिसांनी कोठेही बळाचा वापर केला नाही. उलट सारे काही मनसेच्या मनाप्रमाणे होईल याची खबरदारी सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आली होती.
सत्तेत येताच महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. हा मुद्दा राजकीयदृष्टय़ा युतीला फायद्याचा ठरू शकतो. मुंडे यांच्या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी हा मुद्दा पुन्हा हाती घेतला आणि आंदोलन केले.
टोलच्या संवेदनशील विषयावर युतीचा फायदा होऊ नये, असाच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. यातूनच राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पडद्याआडून मदत होईल, अशीच भूमिका घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली.