‘‘शेंडाही नाही आणि बुडखाही नाही अशी काँग्रेसची अवस्था, तर ‘आधे इधर आधे उधर’ अशी राष्ट्रवादीची अवस्था.. काँग्रेसवाले खाऊन खाऊन थकले आहेत’’ अशी घणाघाती टीका करीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धारेवर धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सोमवारी याच पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी दिवसभर केलेली धावपळ फळाला येणार असे दिसत असतानाच, अखेरच्या क्षणी सत्तेचे फासे पालटले, आणि महाराष्ट्रातील सत्तानाटय़ाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली.

गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वाभाडे काढण्याची एकही संधी सोडली नाही. जेमतेम तीन आठवडय़ांपूर्वी, १८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. ‘राहुल गांधी हे पळपुटे असल्याने त्यांना सावरकर कळलेच नाहीत’, असा ‘प्रहार’देखील उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर जेमतेम तीन आठवडय़ांतच राजकारणाचे वारे फिरले, आणि पाठिंब्यासाठी गांधी कुटुंबाशी चर्चा करण्याची वेळ ठाकरे यांच्यावर आली. शरद पवार यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान जोरदार ताशेरे मारले होते. ‘केवळ जुन्या अग्रलेखावरून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सूडाने कारवाई करणाऱ्यांनी ईडीच्या मुद्दय़ावरून सूडाच्या राजकारणाचा आरोप करू नये’, असेही त्यांना पवार यांना सुनावले होते. ‘तुम्ही सूडाचे राजकारण केले, त्यामुळे आम्ही तुम्हाला सोडणार नाही’, असा थेट इशाराच त्यांनी पवारांना दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. ज्यांना धारेवर धरले, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिवसेनेस पाठिंबा देण्याबाबतचे पत्र मात्र राज्यपालांनी दिलेली सोमवारी संध्याकाळपर्यंतची मुदत संपेपर्यंत न मिळाल्याने येत्या काही दिवसांत पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसमवेत समन्वय साधून पुन्हा एकदा सत्तेचा दावा करण्यावर शिवसेना ठाम असल्याचे संकेत युवा सेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी राजभवनावरून रित्या हाताने परतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिले.

‘गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती तुकडे झाले ते मोजतादेखील येणार नाहीत’, असा घणाघात अगदी अलीकडेच करणाऱ्या शिवसेनेस सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चेच्या प्रदीर्घ फेऱ्या पार पाडूनही राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काहीच हाती लागले नाही. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता भ्रष्टवादी काँग्रेस झाली असून पवार हे राजकारणातील ‘सोंगाडय़ा’ असल्याची जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी गेल्याच महिन्यात करमाळा येथील जाहीर प्रचार सभेत केली होती. दहा रुपयांत थाळी देण्याच्या शिवसेनेच्या आश्वासनावर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या टीकेस उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावरही हल्ला चढविला होता. ‘दहा रुपयांच्या थाळीसाठी मी स्वयंपाकीदेखील व्हायला तयार आहे, मात्र, त्या थाळीसाठी अजित पवार यांचे पाणी नको’, असा खोचक टोलाही त्यांनी त्या सभेत मारला होता. राहुल गांधी यांच्यावरील टीकेची तर एकही संधी ठाकरे यांनी सोडली नव्हती. काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तो पक्ष तरी उरला आहे का, असा सवाल करीत, राहुल गांधी यांच्या जागी काँग्रेसला ‘नगास नग’ मिळालेला नाही, असे शरसंधानच शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसवर करण्यात आले होते.

‘महाराष्ट्राच्या नशिबी एक स्वाभिमानी सरकार येणार आहे आणि ती भाग्यरेषा पुसण्याचे कुणाचीही हिंमत नाही‘, असा दावा उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. त्यानुसार शिवसेनेच्या सत्तासंपादनास अनुकूल असे फासेही पडू लागले होते. मात्र, अचानक वेळेचे गणित बिनसले. या ‘घडलंय-बिघडलंय’ प्रकरामागे सेना नेतृत्वाने गेल्या पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचा संदर्भ नाही ना, अशी चर्चा सुरू झाली. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने गुरांच्या छावण्यांमध्ये आणि शेणातही भ्रष्टाचारही केला. उद्या शरद पवार आले तर त्यांना सांगू की, शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमच्याकडे नको’ असा एक सणसणीत टोला गेल्या १६ एप्रिल रोजी परभणीत पवार यांच्या राष्ट्रवादीला लगावला होता. ‘अजित पवार यांना तर महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही, काकांच्या पुण्याईवर ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे, व अजित पवार यांची रिकामी खोपडी हा त्या तंबूचा कळस आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी अजित पवार यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या ‘ऐशा नरा, मोजुनी मारा पैजारा’ या संतांच्या शिकवणुकीचा अवलंब केल्याशिवाय महाराष्ट्राची जनता राहणार नाही’, असे भाकीतही उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी २७ ऑक्टोबरला केला होता.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसोक्त टीका करणाऱ्या शिवसेनेचे भाजपसोबतचे सत्तावाटपाचे स्वप्न संपल्यानंतर अखेर सत्तेसाठी याच पक्षांशी चर्चा करण्याची वेळ शिवसेनेवर आली. दरम्यानच्या काळात, ‘आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आहे’ असे शरद पवार वारंवार स्पष्ट करीत होते. तरीही या महाशिवआघाडीची मोट बांधण्याचे शिवसेनेचे प्रयत्न अद्याप संपलेले नाहीत, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंब्याबाबत संदिग्धता साधून या टीकेची परतफेड करण्याची संधी काँग्रेस-राष्ट्रवादीने साधली असावी, असे बोलले जात आहे.