सिंचन प्रकरणी गुन्हे दाखल करून मुख्यमंत्र्यांचाही सूचक इशारा

सरकारच्या विरोधातील हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना भावेल अशा पद्धतीने इशारा देत सारे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकतात किंवा उभय पक्षांचे अधिक सख्य झाल्याचा संदेश या मोर्चाच्या माध्यमातून गेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाच्याच दिवशी सिंचन या राष्ट्रवादीशी संबंधित संवेदनशील विषयावर गुन्हे दाखल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दुरावा कमी झाला आहे. भाजपच्या विरोधात लढण्याकरिता दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी आपापली राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला.

आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपपुढे आव्हान उभे राहू शकते. त्यातूनच मोर्चातील भाषणात प्रफुल्ल पटेल आणि अशोक चव्हाण यांनी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास राज्यात नक्कीच सत्ता परिवर्तन होईल, अशी ग्वाही दिली.

राष्ट्रवादीच्या भाजपबद्दलच्या जवळिकीबद्दल काँग्रेस नेते नेहमी साशंक असतात. परंतु राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भाजपला शह देण्याकरिता दोन्ही काँग्रेस एकत्र येतात हा संदेश जाणे आवश्यक होते.

नागपूरच्या हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचा योग्य संदेश गेल्याचे मत काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केले.

मोर्चात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर झाल्यापासून काँग्रेस नेत्यांनी नाके मुरडली होती. पण अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी स्थानिक नेत्यांची समजूत काढली. शेतकऱ्यांनी देणी देऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या नाराजीला वाट करून दिली. पवारांच्या या आक्रमक भूमिकेचा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला अधिक फायदा होऊ शकतो.

  • हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांनी देणी किंवा कर देऊ नये, असे आवाहन केले.
  • पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला आव्हान दिले. हल्लाबोल मोर्चाच्याच दिवशी सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल करून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला तेवढाच सूचक इशारा दिला आहे.
  • जास्त ताणाल तर शेपटावर पाय देऊ, असा संदेशच मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल होणे हे राष्ट्रवादीसाठी तापदायकच आहे.