नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल ६१ दिवसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. काळा पैसा बाहेर काढू, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल अजित पवार यांनी केला. दोन्ही काँग्रेसच्या आंदोलनांपासून सामान्य जनता मात्र दूरच होती.

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर वातावरणनिर्मिती करण्याच्या उद्देशाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने स्वतंत्रपणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. काँग्रेसने जिल्हा आणि तालुका पातळीवर घंटानादाचे आयोजन केले होते, तर राष्ट्रवादीने ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने मोठा मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अजित पवार हे पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले होते तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निदर्शने करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे या भोर तालुक्यातील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूरमध्ये पुणे-बंगळुरू महामार्गावर खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव येथे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी आंदोलन केले.

काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. नोटाबंदीनंतर ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. ही मुदत संपली तरी नागरिकांना अजूनही नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागत आहे. बँकांमधून पैसे काढण्यावरील र्निबध अजूनही कायम आहेत. यामुळेच काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू करण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

११ तारखेला नवी दिल्लीत काँग्रेसने याच मुद्दय़ावर सभेचे आयोजन केले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही ठिकाणी स्वत:ची छायाचित्रे काढण्यापुरते आंदोलन केले. जनतेमध्ये या प्रश्नावर संतप्त प्रतिक्रिया असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असला तरी या आंदोलनांमध्ये सामान्य जनता कुठेही स्वत:हून सहभागी झाली नव्हती. छायाचित्रे काढण्यापुरतेच दोन्ही काँग्रेसचे आंदोलन यशस्वी झाले, अशी मार्मिक प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आली.

मोदींची छायाचित्रे काढून टाका

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता पाच मतदारसंघांमध्ये लागू झाली आहे. लवकरच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांची आचारसंहिता लागू होईल. अशा वेळी पेट्रोलपंप किंवा अन्य काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झळकणारी छायाचित्रे काढण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली.