शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यावरून काँग्रेसमध्ये एकवाक्यता होत नव्हती. पण बिगर भाजप सरकारसाठी पाठिंबा द्यावा, या निर्णयाप्रत काँग्रेसचे नेतृत्व आले होते, पण पाठिंब्याचे पत्र मात्र शेवटपर्यंत पाठविण्यात आले नाही. काँग्रेस नेते या गोंधळास राष्ट्रवादीलाही दोष देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या संभाव्य सरकारला पाठिंबा देण्यासंदर्भात केंद्रीय तसेच प्रदेश नेत्यांशी दोन वेळा चर्चा करूही अंतिम निर्णय झालाच नाही. त्यामुळे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी उत्साहात राज्यभवनावर गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांचा पुरता हिरमोड झाला. राज्यात बिगरभाजप सरकार स्थापण्याबाबत दिल्लीत सोमवारी दिवसभर नाटय़मय घटना घडल्या. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी तब्बल साडेतीन तास चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आदी प्रदेश नेत्यांनी तसेच बहुसंख्य आमदारांनी बिगरभाजप सरकारला पाठिंबा देण्याबाबत अनुकूल मत व्यक्त केले. सुकाणू समितीतील ए. के. अण्टनी, प्रदेश प्रवक्ते मल्लिकार्जून खरगे, रजनी पाटील, राजीव सातव हेही बैठकीला उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतरही काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला नाही.

प्रदेश नेत्यांच्या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर बोलणी केली. त्यानंतर काँग्रेसने पक्षाचे दोन निरीक्षक मंगळवारी राज्यात पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तास्थापनेबाबतचा निर्णय एकत्रितपणे घेईल, अशी अधिकृत भूमिका काँग्रेस नेतृत्वाने घेतली.  या पत्रानंतर काँग्रेस शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र पाठवणार नसल्याचे स्पष्ट झाले.

शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास पक्षाच्या केरळमधील नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला. यातून पक्षाच्या अल्पसंख्यांक मतपेढीला धक्का बसेल  असाही सूर होता.

आमदार फुटण्याची भीती

बिगर भाजप सरकारसाठी पाठिंबा न दिल्यास काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता जास्त दिसते. ही बाब त्यातूनच सोनिया गांधी यांनी गांभीर्याने घेतली. काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास पाठिंबा आहे.

आज पुन्हा बैठक

राज्यातील सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यासंदर्भात सोनिया गांधी यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता पुन्हा बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेस वा शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देण्यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचाही पाठिंबा नाही!

*  शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसनेते चर्चा करत होते मात्र, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिलेल्या लेखी पाठिंब्याची अपेक्षा होती. काँग्रेसची बठक रात्री आठपर्यंत सुरू होती.

* तरीही राष्ट्रवादीने शिवसेनेला पािब्यिंचे पत्र दिले नव्हते. त्यामुळे काँग्रेसनेही पाठिंब्याबाबत हात आखडता घेतल्याचे सांगितले जाते.

नाटय़मय घडामोडी

* महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत नवी दिल्ली आणि मुंबईत सोमवारी नाटय़मय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात विविध हालचाली सुरू होत्या.

* काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र मिळणार, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत होता.

* सरकार स्थापण्याचा दावा करण्याची मुदत संपेपर्यंत म्हणजे सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत काँग्रेसकडून पत्र आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनेही शिवसेनेला पत्र देण्याचे टाळले.

* शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांचा मंत्रिपदाचा राजीनामा. शिवसेनेच्या गोटात सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू

* काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक. राज्यातील काँग्रेस नेत्यांना नवी दिल्लीत पाचारण करण्यात आले

* राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक

* भाजप नेते काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी. सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हालचालींकडे लक्ष

* दुपारी एकच्या सुमारास शरद पवार हे पक्षाच्या नेत्यांसह वांद्रे येथील ताज लॅण्डस हॉटेलकडे रवाना

* शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा.

* शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा. राष्ट्रवादीच्या नेत्यांची पवारांच्या उपस्थितीत बैठक

* सायंकाळी चारनंतर सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक.

* सायंकाळी पावणेसातला आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे हे राजभवनवर दाखल

* आदित्य ठाकरे यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सरकार स्थापण्याचा दावा

* शिवसेनेच्या दाव्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पत्राचा समावेश नव्हता

* शिवसेनेने वेळ वाढवून देण्याची केलेली मागणी राज्यपालांनी फेटाळली

* शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनातून बाहेर

* काँग्रेस नेत्यांची बैठक निर्णयाविनाच संपली

सावंत यांचा राजीनामा

नवी दिल्ली : राज्यात बिगर भाजपचे सरकार स्थापन करण्याकरिता शिवसेनेने केंद्र सरकारमधून बाहेर पडावे, या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अटीनुसार शिवसेनेचे केंद्रातील प्रतिनिधी अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा सादर केला. परंतु सावंत यांनी वेळ मागूनही पंतप्रधान मोदी यांनी त्यांना भेट नाकारली. शेवटी पंतप्रधान कार्यालयात राजीनामा पत्र सावंत यांनी पाठविले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेदरम्यान सत्तेत समसमान वाटा आणि मुख्यमंत्री पद यानर सहमती झाली होती. हे आश्वासन भाजपने पाळले नाही.  जनतेने महायुतीला कौल दिलेला असतानाही भाजपने वचन न पाळल्याने सेनेसमोर युती तोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असे सावंत यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp objection to support shiv sena abn
First published on: 12-11-2019 at 01:56 IST