‘‘कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका. ज्या मतदारांवर मदार ठेवून आपण निवडणुका लढविणार आहोत, त्यांचीच नावे मतदारयादीतून गाळण्याचे षड्यंत्र काँग्रेस-राष्ट्रवादीने आखले आहे. ते हाणून पाडण्यासाठी मोहीम सुरू करा,’’ असा आदेश देतानाच स्वबळावर सत्ता मिळवू असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी षण्मुखानंद सभागृहात पक्षाच्या सातव्या वर्धापनदिनी दिला.
आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना-भाजप-रिपाइं यांच्या ‘विशाल युती’ची जोरदार चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी उद्योगपती रतन टाटा यांनी राज ठाकरे यांच्या दादरच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल सव्वा तास चर्चा केली. सहसा कुठेही न जाणाऱ्या रतन टाटा यांच्यासारख्या व्यक्तीने आपल्या घरी येणे हा कार्यकर्त्यांच्या पुण्याईचाच भाग आहे, असे राज ठाकरे म्हणाले, तेव्हा सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.  मनसेच्या मुंबईतील हजारो मतदारांची नावे मतदारयादीतून काढून टाकण्याचे षड्यंत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतरांनी रचले असून मनसेचे आमदार, विभागप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील याद्या तपासून नावे वगळलेल्या मराठी मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व संबंधितांकडे पाठपुरावा करावा असा आदेशच ठाकरे यांनी दिला. जनहिताची कामे सुरू ठेवलीच पाहिजेत, पण जर तुमच्या मतदारांची नावेच यादीत नसतील, तर निवडून कोण देणार? असा सवाल ठाकरे यांनी केला. स्थापनेच्या दिवशीच राज्यभरात पसरलेला हा पक्ष असून केवळ मुंबई, पुणे, नाशिकपुरता मर्यादित पक्ष असल्याबाबत टीका करणाऱ्यांची ठाकरे यांनी खिल्ली उडविली. कार्यकर्त्यांच्या जोरावर स्वबळावर सत्ता आणणार, हे आपले उद्दिष्ट राजकीय पंडितांना आज पटणार नाही. पण नजीकच्या काळात ते त्यांनाही पटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  
‘टाळी’ला टाटा!
‘लोकसत्ता’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या विशाल युतीच्या बातमीने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली. विशाल युतीच्या चर्चेमुळे शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र ‘राजकीय सोय’ म्हणून काही नेत्यांनी या वृत्ताचे खंडन केले, तर भाजपच्या नेत्यांनी त्याचे स्वागतच केले. या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष होते. मात्र सकाळी झालेली रतन टाटा यांची भेट हा मनसेसाठी शुभसंकेत असल्याचे सांगत त्यांनी वृत्तपत्रातून सकाळी आलेल्या ‘टाळी’ला ‘टाटा’ केले आहे, असे सांगत काहीही स्पष्ट बोलण्याचे टाळले.