दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि भ्रष्टाचाराने त्रस्त आणि संतप्त झालेल्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडून मराठा आरक्षणाचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याने सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यात कोणताच अडथळा नाही. मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरक्षण लागू न करता काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केवळ नौटंकी करण्यात येत असल्याचे राज यांनी सांगितले.
जातीच्या आरक्षणासाठी एकत्र येणारे नेते महाराष्ट्रातील अन्य प्रश्नांसाठी का एकत्र येत नाहीत, असा सवाल करून केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटवत असल्याचा आरोप राज यांनी केला. सातारा, लातूर, जत, पंढरपूर, सोलापूर, नांदेड, जालना, बीड आणि औरंगाबाद येथे मनसेने उभारलेल्या दुष्काळी छावण्यांची पाहणी करण्यासाठी राज यांचा दौरा सुरू झाला असून या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील जनतेचे लक्ष दुष्काळापासून दुसरीकडे वेधण्यासाठीच कधी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जातो तर कधी जातीपातींचे राजकारण खेळले जाते.
सर्वच आघाडय़ांवर सपशेल नापास असलेले आघाडी सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही की लोकांना साधे पाणीही देऊ शकत नाही. दुष्काळात जनता होरपळत असताना सरकारमधील मंत्री आणि नेते आपल्या मुलाबाळांच्या लग्नात दौलत जादा करण्यात मग्न आहेत.
सर्व पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना सरकाराला निर्णय घेण्यास कोणी रोखले आहे? सरकारला केवळ मतांवर डोळा ठेवून आरक्षणाचे राजकारण करायचे आहे. सरकारकडे नोकऱ्याच उपलब्ध नसताना आरक्षण देऊन काय साध्य करणार आहेत हा एक प्रश्नच आहे. समाजात फूट पाडून निवडणुकीत मते मिळविण्यातच सरकारला रस आहे. या नौटंकीचा बुरखा आगामी काळात आपण फाडू, असेही राज यांनी सांगितले.