News Flash

जिल्हा परिषदांमधील भाजपच्या सत्तेला हादरा देण्याची खेळी

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचे ठरविले आहे.

अध्यक्षपदांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी

मधु कांबळे, मुंबई : राज्याच्या सत्तेतून भाजपला दूर ठेवण्याची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची खेळी यशस्वी झाल्यानंतर आता हाच प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी करण्याचे या तिन्ही पक्षांनी ठरविले आहे. येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकत्रितपणे उतरण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीच्या नावाने सरकार स्थापन झाले. त्यानंतर नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार व पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या जिल्हा परिषदांसाठी ७ जानेवाराली मतदान होणार आहे. या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु वेळ कमी असल्याने काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, असे काँग्रेसमधील सूत्राने सांगितले.

३० डिसेंबर ते ५ जानेवारी या दरम्यान २५ जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समित्यांचे सभापती यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदांमधूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. आघाडीची रणनीती ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात शिवसेनेच्या वतीने खासदार अनिल देसाई, विनायक राऊत व आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसच्या वतीने माजी आमदार मोहन जोशी, कल्याण काळे, अ‍ॅड. गणेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे.

गुरुवारी समितीची पहिली बैठक झाली. त्यात जिल्हा परिषदांमध्ये कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ आहे, कोणती जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे, भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदा किती आहेत, तीन पक्ष एकत्र आल्यानंतर संख्याबळाच्या आधारावर किती अध्यक्षपदे, उपाध्यक्षपदे व सभापतिपदे आघाडीकडे येऊ शकतात, यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली.

२० परिषदा ताब्यात घेण्याचा प्रयत्न

* शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर संख्याबळाच्या आधारावर २५ पैकी किमान २० जिल्हा परिषदा महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊ शकतात, असा अंदाज आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी व भाजपची युती आहे. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत ही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्याची तयारी आघाडीने सुरू केली आहे.

* अहमदनगर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असली, तरी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने विखेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याची रणनीती आखली आहे.

* बीड, जळगाव, गडचिरोली, सांगली व कोल्हापूरमध्ये भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. जालना, वर्धा व चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीची समसमान ताकद आहे. अपक्ष सदस्य कुणाच्या बाजूने जातात, त्यावर येथील सत्तेचे गणित ठरणार आहे. मात्र एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपला आव्हान देण्याचे ठरविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 4:03 am

Web Title: congress ncp shiv sena alliance in local bodies election zws 70
Next Stories
1 पीएमसी बँक घोटाळा : पाच आरोपींविरोधात आरोपपत्र
2 बालनाटकांना विषयांची मर्यादा
3 वरळी-शिवडी उन्नत मार्ग कात्रीत
Just Now!
X