महायुती आणि आघाडी यांच्यात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्येही फाटाफूट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक छोटे-मोठे नेते सध्या भाजपच्या दारात रूंजी घालत असून, शिवसेनेतील काही नेते फोडण्यासाठीही भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनांनुसार धक्कातंत्राचा वापरही केला जाणार आहे. मनसेशी नवे नाते जोडण्याच्या पर्यायाचाही विचार भाजपमध्ये सुरू आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, मंत्री व माजी आमदारही भाजपच्या संपर्कात होते. युतीचा निर्णय होत नसल्याने आणि अनेक जागा शिवसेनेकडे असल्याने तेथे या नेत्यांना उमेदवारी देणे शक्य नसल्याने भाजपमध्ये त्यांचे प्रवेश होऊ शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनीही भाजपशी चर्चा झाल्यावर शिवसेनेचा मार्ग धरला. आता युती तुटल्याने केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर शिवसेनेतील नेत्यांनाही भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण जगताप यांना गुरुवारी तातडीने भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. भाजपच्या सर्वेक्षणानुसार जे अन्यपक्षीय नेते प्रभावी आहेत, त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
शिवसेनेच्या विरोधामुळे महायुतीत मनसेचा समावेश होऊ शकला नव्हता. मनसेने उमेदवार यादी जाहीर केली असली तरी काही जागांवर समझोता होऊ शकतो, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
भाजप-राष्ट्रवादी छुपी युती?
शिवसेना खासदार आनंद अडसूळ यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती झाल्याचा आरोप केला आहे. तर युती तोडण्याचा निर्णय जाहीर होण्याआधी दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपला युती तोडण्याची घाई झाल्याचाही आरोप केला. चर्चेसाठी आम्हाला बराच काळ थांबवून ठेवण्यात आले व न बोलता भाजप नेते निघून गेले. शिवसेना त्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे रावते यांनी सांगितले.