आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने विविध नेत्यांकडे जबाबदारी सोपविताना निवडणूकपूर्व आघाडीच्या उपगटाची जबाबदारी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्याकडे सोपविल्याने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी कायम राहण्यात अडचण येणार नाही. कारण शरद पवार आणि अँटनी यांचे जुने चांगले संबंध असून, दोघांनी काँग्रेसच्या बाहेर असताना काँग्रेस (एस) मध्ये एकत्र काम केले होते.
राज्यात १९९९ पासून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असले तरी उभयतांमधील संबंध प्रथमच कमालीचे ताणले गेले आहेत. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास काँग्रेसमधील एका गटाचा कायमच विरोध असतो. राष्ट्रवादीतही काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध वाढला आहे. विशेषत: अजित पवार काँग्रेसच्या विरोधात आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेसची सारी सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे असणार हे आता स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला असलेला विरोध लपून राहिलेला नाही. या पाश्र्वभूमीवर आघाडी होणार की नाही, याबाबत शंकेची पाल चुकचुकत असते.
महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी दोघांनाही परस्परांची निवडणुकीत गरज भासते. काँग्रेसची पारंपरिक आदिवासी, दलित व अल्पसंख्याकांची मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हस्तांतरित होतात. काँग्रेसलाही राष्ट्रवादीची आवश्यकता असते. राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला २० ते २२ टक्के तर राष्ट्रवादीला १८ ते २० टक्के मते मिळतात. हे दोघे वेगवेगळे लढल्यास विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. उभयतांना वेगळी चूल मांडून फायदा होणार नाही. त्यामुळे कितीही भांडले तरी निवडणुकीत दोघांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो.
काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडयांसाठी नेमलेल्या उपगटाचे प्रमुख अँटनी आहेत. अँटनी व पवार या दोघांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. आणीबाणीनंतर अँटनी काँग्रेसमधून बाहेर पडले होते. तेव्हा काँग्रेस (एस) मध्ये देवराज अर्स, उन्नीकृष्णन आदी नेत्यांबरोबर पवार आणि अँटनीसुद्धा होते. राज्याचे काँग्रेसचे प्रभारी असताना अँटनी यांनी राष्ट्रवादी किंवा पवार यांच्या विरोधात कधीच भूमिका घेतली नव्हती.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटप करताना अँटनी यांनी राष्ट्रवादीच्या मनाप्रमाणे केले होते. त्यावरून राज्यातील काँग्रेस नेते अँटनी यांच्या विरोधात खासगीत मतप्रदर्शन करीत. हेच अँटनी आघाडीचा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार असल्याने राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम राहण्यात काही अडचण येणार नाही, असेच एकूण चिन्ह आहे. चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४च्या निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी म्हणून लढेतील, अशी ग्वाही दिल्याने आघाडीत बिघाडी होणार नाही अशी आता तरी चिन्हे आहेत.
शरद पवार यांनीही काँग्रेसची इच्छा असल्यास राष्ट्रवादीबरोबर लढेल, असे स्पष्ट केले आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकांना अद्याप १८ महिन्यांचा कालावधी असल्याने पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे तेव्हा कशी परिस्थिती असेल हे आताच सांगणे कठीण आहे.