काँग्रेसकडून शनिवारी विधानपरिषदेसाठीच्या उमेदवारीसाठी नारायण राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये तब्बल ५२ जण इच्छूक होते. त्यासाठी दिल्लीत जोरदार फिल्डिंगही लावण्यात आली होती. मात्र, अखेरीस नारायण राणे यांची आक्रमक नेतृत्त्वशैली लक्षात घेता काँग्रेस नेतृत्त्वाकडून त्यांना विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्यासाठी राणे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाले होते. उमेदवारीला विरोध होऊ नये, यासाठी ते पक्षाच्या नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत होते. मुंबई प्राधिकारी संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळी राणे यांना उमेदवारी देण्यास पक्षाच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर यंदा राणे यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला होता. त्यासाठी राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीदेखील भेट घेतली होती. उमेदवारीला पाठिंबा हवा, अशी अपेक्षा राणे यांनी दोन्ही चव्हाणांकडे व्यक्त केल्याचे समजते. आघाडीच्या तीन जागा निवडून येणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनीही प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे. राणे यांच्याबरोबरच विद्यमान आमदार मुझ्झफर हुसेन यांचे नाव आघाडीवर होते.