पक्षाचा जनाधार घटला असतानाही काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून नेहमीचा घोळ सुरूच आहे. आपापल्या समर्थकांच्या उमेदवारीचे प्रयत्न नेतेमंडळींकडून सुरूच होते.

यंदा पक्षाची अवस्था फार काही चांगली नसल्याने वाद कमी होतील, अशी अपेक्षा होती. पण पक्षाचे उमेदवार निश्चित करताना नेहमीप्रमाणेच गोंधळ सुरू आहेत.  काँग्रेस पक्षाने अध्यक्षांच्या मदतीला पाच कार्याध्यक्ष नेमले. याशिवाय अ. भा. काँग्रेसने नियुक्त केलेले विभागवार सचिव आहेतच. गेल्याच आठवडय़ात विभागवार वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली. या साऱ्यातून गोंधळच वाढल्याचे सांगण्यात येते.

प्रदेश पातळीपासून दिल्लीपर्यंतच्या नेतेमंडळींनी आपापल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला आहे. पक्षाच्या वाटय़ाला १२५जागा येणार असून, यापैकी १००च्या आसपास जागांवरील उमेदवारांची यादी छाननी समितीने निश्चित केली आहेत. ही यादी आता सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील पक्षाच्या केंद्रीय समितीकडे मान्यतेसाठी जाईल. याच दरम्यान काही नेत्यांनी सोनिया गांधी व वेणूगोपाळ यांच्याकडे उमेदवारांच्या यादीवरून तक्रारींचा पाढा वाचला. परिणामी पक्षाचे संघटनात्मक सरचिटणीस वेणूगोपाळ यांनी सविस्तर माहिती मागविली आहे.

हुसेन दलवाईंची नाराजी

पक्षात हा घोळ सुरू असतानाच अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय समाजाचे उमेदवार निवडून येतील असे मतदारसंघ मित्र पक्षांना सोडण्यास पक्षाचे खासदार हुसेन दलवाई यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली होती. नेमके हेच मतदारसंघ राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष अशा मित्र पक्षांना का सोडण्यात येत आहेत, असा सवाल दलवाई यांनी केला आहे. आपण या संदर्भात पक्षातील अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांची नाराजी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातल्याचे हुसेन दलवाई यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या आणि विद्यमान आमदारांच्या उमेदवारीची पहिली यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण ही यादीही रखडली आहे. बहुधा सोमवारी किंवा मंगळवारी पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा

काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरी दोन्ही पक्षांकडून स्वंतत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. राष्ट्रवादीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध केला जाईल. शेतकरी वर्गाला झुकते माप या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्याकरिता विविध आश्वासने देण्यात आली आहेत.

पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जागांबाबत मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. यामुळेच या जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आलेले नाहीत. उर्वरित अन्य जागांवरील नावे छाननी समितीने निश्चित केली आहेत.

– बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष