आगामी लोकसभेची निवडणूक नरें्िन मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार असली तरी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी कोणाचेही नाव अधिकृतपणे जाहीर केले जाण्याची शक्यता नाही.
 राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्याची कोणतीही घाई काँग्रेसकडून केली जाणार नाही, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाची सारी सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात आल्याने पक्षाचे पंतप्रधानपदाचे तेच उमेदवार असतील हे स्पष्टच आहे. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला तेवढे वातावरण अनुकूल नाही.
काँग्रेसला २७२ हा जादुई आकडा गाठण्यासाठी मित्र पक्षांवर जास्त विसंबून राहावे लागणार नसेल तरच राहुल गांधी हे पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार होतील, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. काँग्रेसला १३० ते १४० जागांवरच समाधान मानावे लागल्यास डॉ. मनमोहन सिंग हेच पुन्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला डिवचण्याची संधी साधली आहे.
दरम्यान, निवडणुकीआधी मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानपदासाठी उमेदवारी घोषित करण्याची काँग्रेसची प्रथा नसून, आगामी निवडणुकीतही तिचेच पालन केले जाईल, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री रतनजीत प्रताप नरेन सिंग यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे सांगितले.

राहुल गांधी नागपूर आणि पुण्याच्या दौऱ्यावर
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पुढील आठवडय़ात राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.  नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये २४ आणि २५ तारखेला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांमधील पदाधिकाऱ्यांबरोबर ते संवाद साधणार आहेत.  विदर्भावर काँग्रेसची मदार असून, दहापैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. विदर्भातील दौऱ्यात ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. शरद पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून यापाठोपाठ राहुल गांधी दौरा करणार हे चित्र तयार होऊ नये, अशी काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. तरीही विदर्भातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून विदर्भातील नेते राहुल गांधी यांच्याकडे आग्रह धरण्याची शक्यता आहे.  पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी या भागात संघटना वाढविण्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भर दिला आहे.