निवडणुका जवळ आल्यावर आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आणि प्रत्यक्ष निवडणूक एकत्रित लढायची हे काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रत्येक निवडणुकांमध्ये सुरू असते. निवडणुकांना अद्याप आवकाश असताना आघाडी नको, असे बिगुल आतापासूनच उभय बाजूने वाजू लागले आहे. काँग्रेसमध्ये आघाडीबाबत नकारात्मक सूर असतानाच आघाडीचा निर्णय दिल्लीत होतो आणि आम्ही आघाडी धर्माचे पालन करतो, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतून लादल्या जाणाऱ्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे नापसंती व्यक्त केली.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्यमंत्री चव्हाण आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश तिला उपस्थित होते. आघाडीचा निर्णय कोणासाठीच समाधानकारक नसतो, ही ठाकरे यांची भूमिका, राज्यात काँग्रेसला कोणाच्या कुबडय़ांची गरज भासू नये अशा पद्धतीने संघटना भक्कम करा, असा मोहन प्रकाश यांचा सल्ला आणि आघाडीबाबत दिल्लीचा निर्णय मान्य करणे भाग पडते हे मुख्यमंत्र्यांचे मतप्रदर्शन यावरून काँग्रेसने आतापासूनच राष्ट्रवादीविरोधी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.
मुख्यमंत्र्यांची दिलगिरी
दरम्यान, मुख्यमंत्री चव्हाण यांनी शरद पवार यांच्या विधानावर दिलेल्या प्रतिक्रियेबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. गुजरात निवडणुकीवरून पवार यांनी काँग्रेसला इशारा दिला होता. त्यावर राष्ट्रवादीला राज्यात विरोधात बसायचे का, असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. त्यावर पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे गुजरातची जबाबदारी कधी आली आणि राज्यातील प्रश्न संपले का, असा चिमटा काढला होता. मात्र गुजरातचा संदर्भ माहीत नव्हता. मी दिलगीर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.