मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शनिवारपासून ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हे अभियान राबविण्यात येणार, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका आघाडीने एकत्रित लढविल्या. त्यानंतर या पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याची चर्चा सुरू आहे, परंतु आता मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी पुढील वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिके च्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूर लावला आहे. कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिका निवडणुकीची काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १६ ते ३१ जानेवारीदरम्यान ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हे अभियान सुरू  करण्यात येणार असून त्याअंतर्गत शंभर दिवसांत शंभर प्रभागांमध्ये पदयात्रा काढून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईच्या लोकसभा मतदारसंघनिहाय सहा जिल्ह्य़ांत मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. राज्य सरकारमधील काँग्रेसचे बाराही मंत्री महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतील, अशी माहिती त्यांनी दिली.

मालमत्ता कर माफ करण्याची मागणी

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा २०२५पर्यंत मालमत्ता कर माफ करावा, तसेच ५०१ ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा ६० टक्के मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली.

* विधिमंडळात व महापालिका सभागृहात तसे ठराव एकमताने मंजूर केले आहेत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

* मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांची घरे देण्यात यावीत, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली.

* मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची व वेळखाऊ आहे. त्यात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे दहा हजार गृहनिर्माण संस्था अडचणीत आल्या आहेत. हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी अभिहस्तांतरणाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.