प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूर; बसपसोबत युतीसाठी आग्रह

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनाविरोधातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज्यातील लहानसहान धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना बरोबर घेऊन एक व्यापक आघाडी उभी करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे, अशी चर्चा पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही, असा सूरही बैठकीत होता. विदर्भात काँग्रेसला त्रासदायक ठरणाऱ्या बहुजन समाज पक्षाला या वेळी सोबत घ्यावे, असा आग्रह काही पदाधिकाऱ्यांनी धरल्याचे समजते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस नेतृत्वाने राज्यातील प्रभारी बदलण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार खरगे यांनी दोन दिवसांचा मुंबई दौरा केला. त्यात प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांच्या बैठका घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी युतीवर चर्चा झाली. आताच्या परिस्थितीत युती होणे आवश्यक आहे. परंतु, केवळ तेवढय़ावर विसंबून न राहता, भाजप-शिवसेनाविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, शेकाप, बसप व अन्य लहान-मोठय़ा धर्मनिरपेक्ष विचारांना मानणाऱ्या पक्ष-संघटनांना बरोबर घेऊन एक व्यापक आघाडी उभी करण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे, असा बैठकीत सूर होता, असे कळते.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बसपची विदर्भात ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात त्यांचे उमेदवार ५० हजारांपासून ते लाखापर्यंत मते घेतात, त्याचा फटका काँग्रेसला बसतो. त्यामुळे या वेळी बसपलाही सोबत घेण्यासाठी काही जागा त्यांना द्यावात, अशी मते विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे समजते. त्याला खरगे यांनीही अनुकूलता दर्शविल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीबरोबर युती करताना, काँग्रेसच्या महत्त्वाच्या म्हणजे हमखास निवडून येणाऱ्या जागा सुरक्षित राहतील, त्याची खबरदारी घेण्याची सूचना काही पदाधिकाऱ्यांनी केली. राष्ट्रवादीबरोबर युती फसली तर, अन्य लहानसहान पक्षांना बरोबर घेऊन निवडणुका लढविण्याच्या पर्यायावरही चर्चा झाल्याचे समजते.

बैठकीत काही नेते, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात सूर लावल्याने गटबाजीचे दर्शनही नव्या प्रभारींना घडले. मात्र, त्याबाबत त्यांनी कडक शब्दात सर्वच नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना फटकारले. सहा महिन्यांवर निवडणुका आल्या आहेत, सर्व मतभेद विसरुन कामाला लागा, तरच निवडणुका जिंकता येतील, असे त्यांनी सांगितले. देशात काँग्रेसच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे, त्यामुळे गटबाजी नको, असे त्यांनी सुनावले.