मुंबई : मुंबई महापालिकेतही आता लसीकरणावरून राजकारण सुरू झाले असून येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंध लस मोफत देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडून पैसे घ्यावे आणि नंतर ते पालिकेला परत करावे, अशी मागणी शिवसेनेच्या खासदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, या मागणीला राज्यात सत्तेत असलेल्या आणि पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

राज्य सरकारने आतापर्यंत करोनाविषयक कामांसाठी मोठा निधी खर्च केला आहे. राज्यातील संपूर्ण जनतेला करोना प्रतिबंध लस मोफत देण्यासाठी साधारण पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई पालिकेने ठेव स्वरूपात मोठी रक्कम बँकांमध्ये ठेवली असून त्यातील काही निधी तात्पुरत्या स्वरूपात राज्य सरकारने लसीकरणासाठी घ्यावा आणि नंतर तो पालिकेला परत द्यावा, अशी मागणी करणारे पत्र खा. राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. मुंबईसह राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण मोफत व्हावे यात दुमत नाही. आतापर्यंतचे मुंबईकरांचे लसीकरण आणि करोनाबाधितांवरील उपचाराचा खर्च पालिकेने केला आहे. भविष्यातही पालिकाच हा खर्च करणार आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे २४ हजार कोटी रुपयांची मागणी करावी, त्यास आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी घेतली आहे.