विरोधकांची मागणी; गच्चीवरील हॉटेल, नाईट लाईफच्या संकल्पनेवरही प्रश्नचिन्ह

कमला मिल कम्पाऊंडमधील रेस्टोपबला आग लागून झालेला १४ जणांचा मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. या घटनेस महापालिकाच जबाबदार असताना आयुक्तांकडून चौकशी करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी ठरेल. त्यामुळे यातील सत्य बाहेर येण्यासाठी या दुर्घटनेची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

या घटनेसाठी हॉटेल मालकांसोबतच महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले होते, बांधकामामध्ये आगीला पोषक असे साहित्य मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आले होते, आग लागल्यास ती विझविण्याची सक्षम यंत्रणा तर सोडाच पण बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्गदेखील उपलब्ध नव्हता. या साऱ्या त्रुटींसाठी केवळ हॉटेल मालकच नव्हे तर मुंबई मनपादेखील तेवढीच जबाबदार आहे. येथील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून १४ जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल मनपा अधिकाऱ्यांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तींबद्दल संवेदना व्यक्त करतानाच महानगरपालिका आणि राज्य सरकारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारामुळेच मुंबईत अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप केला. मुळातच या घटनेसाठी मुंबई महापालिकाच जबाबदार आहे. त्यामुळे आयुक्तांमार्फत होणारी चौकशी आम्हाला मान्य नसून, मागील दोन वर्षांत मुंबईत इमारत कोसळून व आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या सर्वच घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

कमला मिल परिसरात मोठय़ा प्रमाणावर अवैध बांधकामे आहेत. आग प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. विनापरवानगी ग्राहकांकडून पार्किंगची मोठय़ा प्रमाणात वसुली केली जात आहे. याबाबत मी महानगरपालिका आणि शासनाकडे वारंवार तक्रारी करून दखल घेतली गेली नाही. या भ्रष्टाचारात पालिका, मंत्रालय आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्याने घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

गच्चीवरील हॉटेलचा बालहट्ट धोक्याचा

अनेक हॉटेल्समध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला वेळ नाही आणि त्यांचे नेते गच्चीवरील हॉटेल्सचा आणखी एक बालहट्ट धरून बसले आहेत. कमला मिल कम्पाऊंडमधील हॉटेलदेखील छतावर होते. पण आग लागल्यानंतर खाली उतरायला जागाच नसल्याने अनेकांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. शिवसेना नेत्यांच्या गच्चीवरील हॉटेलच्या धोरणामुळे हा आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढण्याची भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली.

नियमांचे उल्लंघन झाल्याची काही दिवसांपूर्वीच कल्पना – आदित्य ठाकरे</strong>

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यासंबंधात आपण महापालिका आयुक्त अजोय मेहता, स्थानिक आमदार सुनील शिंदे आणि महापालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याशी चर्चा केली. आपण स्वत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भेट दिली असता, अनेक नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे सांगण्यात आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सखोल चौकशीचे आदेश – मुख्यमंत्री

कमला मिल आवारातील आग दुर्घटनेची सखोल चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करा, तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या सर्वावर कठोर कारवाई करा, असे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना दिले.