News Flash

कलंकित मंत्र्यांच्या मुद्दय़ावर वातावरणनिर्मितीत अपयश

भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा उद्देश यशस्वी झालेला दिसत नाही.

कलंकित मंत्र्यांचा मुद्दा काँग्रेसने सातत्याने लावून धरला असला तरी जनमानसात प्रभावी वातावरण निर्मित करण्यात किंवा भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा उद्देश यशस्वी झालेला दिसत नाही.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप व शिवसेनेच्या कलंकित मंत्र्यांचा मुद्दा काँग्रेस व राष्ट्रवादीने तापविला. गेल्या दोन आठवडय़ांत हा मुद्दा सातत्याने चर्चेत राहील याची खबरदारी घेतली. भाजपची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने कलंकित मंत्र्यांचा मुद्दा फायदेशीर ठरेल, असे विरोधकांचे गणित होते.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारावर आरोप करीत सत्तेत आलेल्या भाजपला बदनाम करण्याकरिता कलंकित मंत्र्यांचा मुद्दा काँग्रेसने ताणून धरला. पण हा मुद्दा तेवढा प्रभावी ठरलेला दिसत नाही. जनमानसात त्याची तेवढी तीव्र प्रतिक्रिया नसल्याचे काँग्रेसचे नेते खासगीत मान्य करतात. काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला असला तरी कलंकित मंत्र्यांचा मुद्दा तेवढा प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यानेच राष्ट्रवादीने फार काही ताणले नाही.

कलंकित मंत्र्यांच्या विरोधात कारवाई झाल्याशिवाय कामकाज होऊ दिले जाणार नाही, असा पवित्रा घेऊन विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज तीन दिवस रोखून धरले. सरकारने कोणतेही आश्वासन वा कारवाई केलेली नसताना विरोधक नंतर कामकाजात सहभागी झाले. भाजपबद्दल संशयाचे वातावरण तयार होण्यास या आरोपांमुळे मदत झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजपची खेळी

कोणत्याही मंत्र्यांच्या विरोधात ठोस पुरावे दिल्यास कारवाई करू, असे आव्हानच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे. तसेच सत्तेचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होताच एकनाथ खडसे यांची राजीनामा घेण्यात आला. यामुळेच भाजपकडून काही चुकीचे झाल्यास थारा दिला जाणार नाही, हा संदेश गेला आहे. भाजप भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालते, असा विरोधकांचा आरोप असला तरी त्याच वेळी खडसे यांच्या राजीनाम्यामुळे हा मुद्दा तेवढा प्रभावी ठरत नाही. सत्तेचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होऊनही खडसे यांना भाजप किंवा मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातले असते तर भाजपला ते महागात पडले असते. यामुळेच खडसे यांना दूर करण्याची खेळी भाजपने केली.

केवळ राजकीय हेतूने विरोधकांनी आरोप सुरू केले आहेत. आरोप करताना ठोस पुरावे सादर करणे हे विरोधकांचे काम आहे. आम्ही विरोधात असताना पुराव्यानिशी आरोप करायचो. कोणतेही पुरावे न देता केवळ हवेत आरोप केले जात आहेत.

 –देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री  

संभाजी निलंगेकर-पाटील यांच्यावर कट करून फसवणूक केल्याचा प्राथमिक माहिती अहवाल सीबीआयने  सादर केला आहे. जयकुमार रावळ यांना वाचविण्यासाठी धडपड केली . भ्रष्ट मंत्र्यांना अभय देण्याचे मुख्यमंत्र्यांचे  एक कलमी काम सुरू आहे.

 – राधाकृष्ण विखे-पाटील ,विरोधी पक्षनेते

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2016 12:42 am

Web Title: congress party and ncp fail in maharashtra monsoon session 2016
Next Stories
1 मुंबईत संततधार सुरूच; जनजीवन विस्कळीत
2 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद सेवाज्येष्ठतेनुसार?
3 पालिकेच्या जमिनीवरील खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम
Just Now!
X