काँग्रेसच्या ठरावामुळे राष्ट्रवादीशी आघाडी शक्य

समविचारी पक्षांबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात संमत करण्यात आल्याने राज्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप हा कळीचा मुद्दा राहू शकतो.

राज्यात दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी, असा प्रदेश पातळीवरील नेत्यांचे मत होते. काँग्रेस नेत्यांनीही आघाडीबाबत अनुकूल भूमिका घेतली होती. दिल्लीतच निर्णय व्हावा, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या भोजनाला शरद पवार यांची उपस्थिती, पवार यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी यांनी घेतलेली भेट आणि काँग्रेसच्या नवी दिल्लीतील अधिवेशनात समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचा संमत झालेला ठराव यातून महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येते. भाजपचा सामना करण्याकरिता दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली आहे.

आघाडीबाबत अनुकूल मत असले तरी जागावाटप हा दोन्ही पक्षांमध्ये वादाचा मुद्दा ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे. एकत्रित निवडणूक झाल्यास जागावाटपाचा तिढा आणखी गुंतागुंतीचा ठरेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आतापासूनच केली जात आहे. निम्म्या जागा सोडण्यास काँग्रेसचे नेते तयार होणार नाहीत. दिल्लीने दबाव आणल्यास राज्यातील काँग्रेस नेत्यांचा नाइलाज होईल. राज्यात काँग्रेसची पूर्वीएवढी ताकद राहिलेला नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत अवास्तव मागणी

मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे. तरीही राष्ट्रवादीकडून मुंबईत अवास्तव जागांची मागणी केली जाते, असा सूर काँग्रेसमध्ये आहे. २००९च्या आधारे जागावाटप करायचे की नव्याने पुन्हा जागावाटप करायचे यावर दोन्ही पक्षांना आधी चर्चा करावी लागेल. आघाडीबाबत आम्ही अनुकूल आहोत. पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागावाटप व्हावे ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसची अपरिहार्यता 

समविचारी पक्षांबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा ठराव काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्लीतील अधिवेशनात करण्यात आला. १९९८ मध्ये मध्य प्रदेशातील पचमढीमध्ये झालेल्या अधिवेशनात आघाडी नको, असा ठराव करण्यात आला होता. २००३ मध्ये सिमल्यात झालेल्या अधिवेशनात आघाडीला अनुकूल असा ठराव करण्यात आला होता. आता पुन्हा आघाडीच्या बाजूने ठराव करण्यात आला. काँग्रेसच्या अपरिहार्यतेतून आघाडीबाबत ठराव करावा लागला आहे.