18 January 2019

News Flash

भाजपकडे वळलेल्या दलित मतांवर काँग्रेसचा डोळा

संसदेत काँग्रेसने आज आक्रमक भूमिका मांडली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भीमा – कोरेगावच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर भाजपवर दलितविरोधी असा शिक्का मारत काँग्रेसने भाजपकडे वळलेली मते पुन्हा आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून संसदेत काँग्रेसने आज आक्रमक भूमिका मांडली.

राज्यातील दलित मतदारांमधील मोठा वर्ग पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसला साथ देत असे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून चित्र बदलत गेले. दलित मतदारांमध्ये भाजपचे आकर्षण वाढले. गेल्याच वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दलित मतांच्या पाठिंब्यामुळेच भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. दलित मतांवर अवलंबून असलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा दारुण पराभव झाला होता. गुजरातमध्ये उनाच्या घटनेनंतर दलित समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. तरीही दलितांची मोठय़ा प्रमाणावर मते मिळविण्यात भाजपला यश आले. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या याकडे भाजपच्या नेत्यांकडून लक्ष वेधण्यात येते. रोहित वेमुल्ला, उना आणि भीमा कोरेगाव या तिन्ही प्रकरणांची सांगड घालत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप दलितविरोधी असल्याचा आरोप केला. लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही भाजपवर दलितविरोधी असा हल्ला चढवीत दलितांवर हल्ले झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौनीबाबाच्या भूमिकेत असतात, असा आरोप केला. भीमा कोरेगावच्या घटनेवरून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपलाही या मुद्दय़ावर बचावात्मक भूमिका घ्यावी लागली.

भाजप सरकारच्या विविध धोरणांमुळे मुस्लीम समाजात नाराजी असून, पुढील निवडणुकीत या समाजाची मते मिळतील, असा काँग्रेस नेत्यांना विश्वास आहे. मुस्लिमांबरोबरच दलित समाजाची जोड मिळावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यातूनच काँग्रेसने भीमा कोरेगाव  प्रकरणावरून भाजपला दोष देण्याचा प्रयत्न केला आहे.

First Published on January 4, 2018 2:18 am

Web Title: congress party comment on bhima koregaon violence