काँग्रेसचा सवाल, मोर्चाच्या माध्यमातून निषेध

गुजरातमधील सोराबुद्दीन शेख चकमकप्रकरणी सुनावणी करणारे न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीस भाजपकडून विरोध का केला जात आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आरोप झालेल्या शेख चकमकीची सुनावणी न्या. लोया यांच्यासमोर सुरू होती. एरवी पारदर्शकतेच्या गप्पा भाजपकडून मारल्या जातात. पण संशयास्पद मृत्यूच्या चौकशीस विरोध का करण्यात येत आहे, असा सवाल सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे उपस्थित होते. न्या. लोया यांच्या शवविच्छेदन अहवालाबाबत डॉक्टर असलेल्या त्यांच्या बहिणीने संशय व्यक्त केला होता. सारेच संशयास्पद असल्याने सखोल चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सिंघवी यांनी सांगितले. मुंबई काँगेसच्या वतीने न्या. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी मूक प्रदर्शन करण्यात आले. संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे काळे कपडे परिधान करून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.

चेलमेश्वर रजेवर

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना आव्हान देणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी एक असलेले जे. चेलमेश्वर हे बुधवारी रजेवर होते. त्यांना बरे वाटत नसल्याने ते आले नाहीत असे सांगण्यात आले . न्या. चेलमेश्वर आज न्यायालयात नव्हते व  कुठलीही सुनावणी त्यांच्या नावापुढे मांडण्यात आलेली नव्हती, असे सूत्रांनी सांगितले. सरन्यायाधीश कालच्याप्रमाणेच बुधवारी काम सुरू करण्यापूर्वी चार न्यायाधीशांशी बोलणार होते. बारा जानेवारीला पत्रकार परिषद घेणाऱ्या न्यायाधीशात रंजन गोगोई, मदन बी. लोकूर व कुरियन जोसेफ यांचा समावेश होता. हे चार न्यायाधीश चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी भेटल्याचे समजते. उदय लळित व धनंजय चंद्रचूड हेही मंगळवारी उशिरा चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी गेले होते.