फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सध्या सुरू असलेल्या राजकीय वादात प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत असून, फेरीवाल्यांच्या विरोधात भाजप आणि मनसेत साटेलोटे झाल्याचा आरोप करीत भाजपकडे झुकलेल्या उत्तर भारतीय तसेच अन्य अमराठी मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याची पद्धतशीरपणे खेळी काँग्रेसने सुरू केली आहे.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सध्या मनसे आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या आठवडय़ात मालाडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी चोप दिला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यानंतर हा हल्ला झाल्याचा मनसेचा आरोप आहे. काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते आज दादरमध्ये समोरासमोर आले.  फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काँग्रेसचा डाव यशस्वी झाला.

मुंबईतील उत्तर भारतीय व अन्य अमराठी मतदार नेहमी काँग्रेसला साथ देत. २०१४च्या विधानसभा निवडणुकांपासून हा कल बदलला. पारंपरिक गुजराती मतदारांप्रमाणेच उत्तर भारतीय मतदारांनी भाजपला साथ दिली. त्यातून विधानसभा तसेच गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबईत भाजपला चांगले यश मिळाले. भाजपला यश मिळत असताना काँग्रेसची मात्र मुंबईत पीछेहाट झाली.

भाजप आणि शिवसेनेतो जुंपली आहे. अशा वेळी मुंबई, ठाण्यात शिवसेनेला शह देण्याकरिता मनसे उपयोगी पडेल हे भाजपचे गणित आहे. २००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने हीच खेळी केली होती. त्यातूनच मनसेला बळ देण्याची भाजपची पडद्याआडून भूमिका आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक होताच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजप आणि मनसेत साटेलोटे झाल्याचा आरोप सुरू केला. भाजप सरकार मनसेला  मदत करीत असल्याचे निरुपम यांचे म्हणणे आहे.  अमराठी मतदार हे मनसेच्या विरोधात असतात. अशा मनसेला भाजप मदत करते हे बिंबवून अमराठी मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण तयार करण्याची निरुपम यांची खेळी आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली. ही कारवाई मनसेला मदत करण्याकरिता भाजपच्या इशाऱ्यावरून होत असल्याची टीका काँग्रेसने सुरू केली आहे.

काँग्रेसमध्येही विभागणी

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर निरुपम यांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर किती ताणायचे, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने रेल्वे प्रवासी काँग्रेसच्या विरोधात जातील, अशी भीती काँग्रेस नेत्यांना आहे. पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात सामान्य नागरिकांमध्ये संतप्त भावना असते. त्यांची बाजू घेतल्यास विरोधी प्रतिक्रिया उमटण्याची भीती काँग्रेसमध्ये आहे.