आसाम-केरळातील पराभवामुळे नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह; उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी वेगळा विचार होण्याची शक्यता
बिहारचा अपवादवगळता लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली पराभवाची मालिका खंडित होत नसल्याने काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे कठीण असल्याचा समज पक्षात रूढ होऊ लागल्याने पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अशीच अवस्था झाल्यास राहुल यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच आव्हान दिले जाऊ शकते.
काँग्रेस पक्षाबद्दल जनमानसात निर्माण झालेली विरोधी भूमिका अद्यापही बदललेली नाही. केरळ आणि आसामची सत्ता गमवावी लागल्याने पक्षाकडे आता फक्त सात राज्यांची सत्ता राहिली आहे. कर्नाटकचा अपवादवगळता उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि मिझोराम ही पाच छोटी राज्ये आहेत. पुड्डेचरीची सत्ता आज मिळाली असली तरी हे राज्य छोटेच आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या सात राज्यांमध्ये लोकसभेच्या फक्त ३६ जागा आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळविणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट असले तरी पक्षाची प्रतिमा अजूनही सुधारलेली नाही. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीबद्दल जनतेत नाराजी असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातो. पण काँग्रेसला गेल्या दोन वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बिहार आणि पुड्डेचरीमध्ये आघाडीच्या माध्यमातून यश मिळाले. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू अणि काश्मीर, दिल्ली या राज्यांमध्ये पक्षाचा धुव्वा उडाला होता. आज निकाल लागलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे.
राहुल गांधी यांच्याकडे या वर्षांत पक्षाचे अध्यक्षपद सोपविले जाण्याची शक्यता आहे. मात्र राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल पक्षात खासगीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. १९९६ आणि १९९८ या लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर व १९९९च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशाची अपेक्षा दिसत नव्हती तेव्हा सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा शरद पवार व अन्य नेत्यांनी उपस्थित करीत त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रभावी ठरत नसल्यानेच त्यांच्या नेतृत्वालाही आव्हान दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला फटका बसल्यास राहुल यांच्या नेतृत्वाला उघडपणे आव्हान दिले जाऊ शकते, असा पक्षात एक मतप्रवाह आहे. यातूनच प्रियंका गांधी यांनी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, अशी भूमिका दिग्विजय सिंग यांच्यासारखे नेते मांडू लागल्याने त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. प्रियंका गांधी हेच पक्षाच्या दृष्टीने चलनी नाणे असल्याची काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया आहे.

* राहुल यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची उघडपणे हिंमत कोण करेल का, अशी शंका घेतली जाते. २०१७ मध्ये प्रणब मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांचा पर्याय पुढे केला जाऊ शकतो.
* मात्र वय त्यांना कितपत साथ देईल, याबाबत साशंकता आहे. आणीबाणीनंतर अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते इंदिरा गांधी यांची साथ सोडून गेले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्यास नेतृत्व बदलाची मागणी पुढे येऊ शकते.
* राहुल गांधी यांना स्वत:ची प्रतिमा सुधारून जास्तीत जास्त लोकांमध्ये जावे लागणार आहे. एखादे आंदोलन किंवा भाषण करून महिनाभर लोकांपासून दूर राहण्याची सवय त्यांना बदलावी लागेल, असे मत एका नेत्याने व्यक्त केले.