विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक
राज्यसभा आणि विधान परिषदेची प्रत्येकी एक जागा निवडून येणार असल्याने काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचा या जागांवर डोळा आहे.
काँग्रेसमध्ये इच्छुकांनी दिल्लीदरबारी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विजय दर्डा आणि अविनाश पांडे हे राज्यसभा सदस्य तर दीप्ती चवधरी, मुझ्झफर हुसेन व विजय सावंत हे विधान परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभा आणि विधान परिषदेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते.
विजय दर्डा एकदा अपक्ष तर दोनदा काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर निवडून आले आहेत. नागपूरचे अविनाश पांडे हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या जवळचे मानले जातात. काँग्रेसमध्ये राज्यसभा सदस्यांना साधारणपणे दोनदा संधी दिली जाते. मात्र राज्यसभेतील संख्याबळ आणि पक्षाची गरज लक्षात घेता पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पातळीवर उमेदवार निश्चित केला जाईल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राज्यसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणतीही जागा लढण्यास इच्छुक आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
विधान परिषदेसाठी पराभूत माजी मंत्री व आमदार, अन्य नेत्यांचा डोळा आहे. मुझ्झफर हुसेन हे निवृत्त होत असल्याने पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नेत्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे. मुझ्झफर हुसेन यांना दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली असली तरी दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीत ते निवडून आले होते. अहमद पटेल, गुलाम नबी आझाद आदी नेत्यांशी असलेल्या जवळीकीमुळे त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. दीड वर्षांपूर्वी पक्षाने उमेदवारी देऊनही राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यामुळे ऐन वेळी माघार घ्यावी लागलेले पुण्यातील मोहन जोशी या वेळी संधी मिळावी म्हणून पाठपुरावा करीत आहेत.
हर्षवर्धन पाटील, बाबा सिद्दिकी, नितीन राऊत हे पराभूत माजी मंत्री उमेदवारीकरिता शर्यतीत आहेत. नारायण राणे यांना पक्षाने संधी द्यावी, असा पक्षात एक मतप्रवाह आहे. राणे विधिमंडळात आल्यास पक्षाचा फायदा होऊ शकतो.