‘एमआयएम’शी युतीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेने कोंडी

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसपुढे भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पेच निर्माण केला आहे. एमआयएमबरोबर युती कायम ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत देशात कुठेही एमआयएमबरोबर समझोता करायचा नाही, असे ठरले असल्यामुळे एमआयएमसह भारिपबरोबर निवडणूक आघाडी कशी करायचा असा प्रश्न काँग्रेसपुढे आहे.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी आघाडी करण्याचे ठरविले आहे. राज्यातील लहानमोठय़ा दहा पक्षांचा महाआघाडीत समावेश करायचा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाला आघाडीत घेणे काँग्रेसला महत्त्वाचे वाटते. प्रकाश आंबेडकर यांनी भटके-विमुक्त, धनगर व अन्य मागासवर्गीयांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. आघाडीच्या वतीने राज्यात १८ परिषदा घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात २८ सप्टेंबरला सोलापूरमधील परिषदेने होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात एमआयएमने सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे.राज्यात एमआयएम व भारिपच्या नेतृत्वाखालील आघाडीत निवडणूक समझोता झाल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केल्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.

काँग्रेसबरेबर निवडणूक समझोता करण्याबरोबर एमआयएमबरोबरची युती कायम ठेवण्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे व राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी एमआयएम हाच मुद्दा प्रामुख्याने पुढे आला. त्यामुळे फार तपशीलवार चर्चा होऊ शकली नाही. काँग्रेसमधील सूत्रांकडून  काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतच एमआयएमबरोबर देशात कुठेही युती करायची नाही, असे ठरले आहे. त्यामुळे एमआयएमसह भारिपबरोबर निवडणूक समझोता करणे काँग्रेससाठी अवघड झाले आहे. दिल्लीत २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या स्तरावर वेगवेगळ्या राज्यांतील युती-आघाडय़ांबाबत बैठका होणार आहेत. त्यात राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने विविध समविचारी पक्षांबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींची माहिती देण्यात येणार आहे. भारिप आणि एमआयएमवर त्या वेळी चर्चा होईल, असे सांगण्यात आले.