केंद्र व राज्यातील सत्तेत भागीदार असताना राष्ट्रवादीची दादागिरी काँग्रेसकडून निमूटपणे सहन केली जायची, पण आता अधिकृतपणे आघाडी नसतानाही विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने डोळे वटारताच काँग्रेसने राष्ट्रवादीच्या दबावापुढे सपशेल नमते घेतले आहे. राष्ट्रवादीचा दबदबा एवढा कायम का, असा प्रश्न राज्यातील काँग्रेस नेत्यांना पडला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीने आघाडी तोडून सरकारचा पाठिंबाही काढून घेतला होता. भाजपला मदत होईल, अशाच पद्धतीने राष्ट्रवादीची तेव्हा पावले पडली होती. विधान परिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने अविश्वासाचा ठराव मंजूर केला होता. एवढी कटुता असतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सारी प्यादी राष्ट्रवादीच्या कलाने पडल्याने काँग्रेसचे राज्यातील नेते चकित झाले आहेत.
काँग्रेसने दोन जागा लढवाव्यात, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेतली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेसुद्धा राष्ट्रवादीला झुकते माप देण्यास तयार नव्हते. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे चावी फिरविली आणि काँग्रेसच्या गोटात सारे चिडीचूप झाले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशी चर्चा करून दोन जागांवर पाठिंबा देण्याची मागणी केली.
त्यानुसार काँग्रेसने नारायण राणे यांची एकमेव उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसने एकच जागा लढविण्याचा निर्णय घेतल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने जुळवाजुळव झाली होती, असे त्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीने २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसला दोन जागांवर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. उद्याचे कोणी सांगितले, अशीच काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया आहे.

मित्र जोडण्यासाठीच तडजोड?
काँग्रेसची अवस्था देशभर फार नाजूक आहे. पक्ष कमकुवत झाल्याने जुने मित्र सोडून गेले आणि नव्याने कोणी येण्याची शक्यता लगेचच दिसत नाही. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आघाडीत बरोबर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीच्या मदतीची आवश्यकता आहे. यामुळेच राष्ट्रवादीबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली असावी, अशी चर्चा आहे.