लातूर, परभणीत एमआयएम निष्प्रभ

नगरपालिका निवडणुकांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात मुस्लीमबहुल विभागांमध्ये एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ई-इतेहुद्दील मुस्लिमीन) चांगले यश संपादन केले असले तरी परभणी आणि लातूर या दोन्ही महानगरपालिका निवडणुकांमध्ये या पक्षाचा काहीच प्रभाव पडला नाही. परभणीत मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार निवडून आले आहेत.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये अमरावतीमध्ये एमआयएमने चांगले यश संपादन केले होते. लातूर आणि परभणी या दोन्ही शहरांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. लातूरमध्ये तर एमआयएमने सारी ताकद पणाला लावली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असाउद्दिन ओवेसी यांनी लातूरमध्ये तीन सभा घेतल्या तसेच पदयात्रांमध्ये सहभागी झाले होते. एवढे प्रयत्न करूनही लातूरमध्ये एमआयएमला भोपळा तर फोडता आला नाहीच, अपेक्षेप्रमाणे मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये मतेही मिळालेली नाहीत. लातूरच्या तुलनेत परभणीमध्ये तेवढा जोर लावण्यात आला नव्हता. लातूरमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांतील महिला वर्गाकडून भाजपला मतदान झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येते.

परभणीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती तसेच मुस्लीम समाजाचे नेतृत्वही होते. तरीही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. परभणीत पक्षाचे सारे नेते एकत्र राहिले आणि संघटित प्रयत्न झाले. शहर अध्यक्ष मुस्लीम समाजाचा असल्याने त्याचाही फायदा झाला. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये मतविभाजनाचा फायदा भाजपला होतो, असा संदेश मुस्लीम समाजात गेला. त्याचाही काही प्रमाणात लातूर आणि परभणीमध्ये मुस्लीम समाजाच्या मतदानावर परिणाम झाला असावा, असे पक्षातील मुस्लीम नेत्यांचे म्हणणे आहे.

एमआयएमचे नेते चिथावणीखोर भाषणे करून समाजाला भरीस घालतात. पण त्यातून होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा शेवटी भाजपला होतो हे मुस्लीम समाजाच्या नागरिकांना कळून चुकले आहे. यातूनच मतदारांनी एमआयएमला नाकारले आहे.   – हुसेन दलवाई, काँग्रेस खासदार