इमारत दुर्घटनेवरील चर्चेला राजकीय वळण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेत घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेवरील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर तुटून पडले. तर, आपली बाजू सावरण्यासाठी शिवसेनेने थेट भाजपलाच लक्ष्य केले. एका माणसाच्या चुकीमुळे घडलेल्या या घटनेत १७ माणसे मेली, उद्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो माणसे मरतील, त्याला कोण जबाबदार, असा धारदार हल्ला शिवसेनेकडून भाजवर चढवण्यात आला. सत्ताधारी, विरोधकांमधील या कलगीतुऱ्याने ही चर्चा अखेर राजकीय वळणावर गेली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही दुर्घटना नाही, तर एका व्यक्तीने आपल्या फायद्यासाठी १७ निष्पाप लोकांचे बळी घेतले, असे सांगितले. ही इमारत कोसळून अनेकांचे प्राण जाण्यास जबाबदार असलेल्या सुनील शितप याच्या पत्नीने शिवसेनेतर्फे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती, असे सांगत त्यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारवर टीकेची झोड उठविली. मुंबईत सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे होत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील इमारती पडतात, माणसे मरतात, त्याला शिवसेना जबाबदार आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला.

मोलकरीण आणि शिवसेनेची दादागिरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी शिवसेनेच्या दादागिरीमुळे त्यांच्या विरोधात कुणी तक्रार करायला धजावत नाही, असा आरोप केला. त्यांनी त्यांच्या मोलकरणीचा किस्सा ऐकवला. एकदा मोलकरीण रडत रडत घरी आली. का रडतेस असे विचारले तर म्हणाली मुलाने मारले. का, असा प्रश्न केला तर शिवसेनेत गेल्यापासून त्याची दादगिरी वाढली, असे ती म्हणाली. चव्हाण यांच्या या किश्श्यावर सभागृहात हशा पिकला.

पालिकेकडे ना परवानगी, ना तक्रार

मुंबई : सिद्धिसाई इमारतीच्या तळमजल्यावरील नूतनीकरणासाठी पालिकेकडे परवानगीही मागितली नव्हती आणि या दुरुस्तीबद्दल कोणती लेखी तक्रारही आली नव्हती असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे इमारतीच्या तळमजल्यावरील रुग्णालयासाठी गेल्या वर्षी तीन वर्षांसाठी परवाना घेण्यात आला होता. मात्र हे रुग्णालय बंद करण्याचा अर्ज दोन महिन्यांपूर्वी आल्याने परवाना रद्द केल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. दहा वर्षांपूर्वीपर्यंत ही परवानगी वॉर्ड कार्यालयाकडून दिली जात असे. मात्र यात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत असल्याने इमारत प्रस्ताव विभागाकडून थेट परवानगी देण्याची पद्धत अवलंबण्यात आली. ऑनलाइन अर्ज केल्यावर, जागेची कागदपत्रे तपासून संबंधित संरचनात्मक अभियंता व वास्तुकार यांच्या जबाबदारीवर २४ तासांत अशी परवानगी दिली जाते. मात्र सिद्धिसाई इमारतीच्या तळमजल्यावरील नूतनीकरणासाठी अशी कोणतीही परवानगी मागण्याचा अर्ज पालिकेकडे आला नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party ncp and bjp comment on shiv sena over ghatkopar building collapse
First published on: 27-07-2017 at 02:49 IST