|| मधु कांबळे

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज स्वतंत्र बैठका

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेशी सामना करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याची तयारी दर्शविली असली तरी, जागावाटपावरुन दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा पराभव झाला, तरी ४२ जागा जिंकणारा काँग्रेस ७१ मतदारसंघांत राष्ट्रवादीपेक्षा पुढे आहे. त्यामुळे समसमान जागा वाटपाची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी काँग्रेस मान्य करण्याची शक्यता धूसर आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका होत आहेत, त्यात जागावाटप कशा पद्धतीने व्हावे, यावरही चर्चा होईल, असे सांगण्यात आले.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेचच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत  दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला अपेक्षित आकडा गाठता आला नाही, त्यामुळे लहान पक्ष व अपक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार बनविले. पुढे दोन्ही काँग्रेसने २००४ व २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढवून दोन्ही वेळा राज्याची सत्ता काबीज केली.  २०१४ च्या लोकसभा निवडणुका दोन्ही काँग्रेसने एकत्र लढविल्या, परंतु विधानसभा निवडणुकीत फारकत घेत एकमेकांच्या विरोधातच दोन्ही पक्ष लढले. त्याचा फटका बसला. सत्ता हातातून गेली. आता तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. मात्र त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा काहीशी सरस कामगिरी बजावणाऱ्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांत समसमान म्हणजे १४४-१४४ असे जागावाटप करावे, असा सूर लावला आहे. काँग्रेसमधून त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केला जात नसली, तरी मागील म्हणजे २०१४ च्या निवडणुकीतील जिंकलेल्या जागा आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले मतदारसंघ यांची बेरीज करुन राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस किती पुढे आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आकडेवारीवर खल

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ४२ जागा जिंकल्या, तर ७१ मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या आणि ५६ मतदारसंघांत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढले होते. साधारणत २० मतदारसंघांत दोन्ही पक्षात समोरासमोर लढत झाली होती. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी तीन-तीन जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी १३ जूनपासून दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. काँग्रेसने या आधीच बैठका सुरु केल्या आहेत. गुरुवारी मुंबईसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.