शिवसेनेच्या मोर्चाची काँग्रेसकडून खिल्ली; कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित

शिवसेना सत्ताधारी पक्ष असूनही त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावता आलेले नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री गप्प बसतात आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात, हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाटक आहे, अशा शब्दांत काँग्रेसने शिवसेनेच्या पीक विमा कंपन्यांच्या विरोधातील इशारा मोर्चाची खिल्ली उडविली आहे.

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याचा परतावा देताना मोठय़ा प्रमाणात अडवणूक केली जात असून पात्र शेतकऱ्यांनाही विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. याविरोधात शिवसेनेने येत्या १७ जुलै रोजी विमा कंपन्यांच्या कार्यालयावर इशारा मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याबाबत बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे शेतकरी प्रेम बेगडी असल्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्षाने जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असतात, संबंधित यंत्रणेला आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करून घ्यायची असते. मात्र शिवसेनेचे सरकारमध्ये काहीही चालत नाही. शेतकरी कर्जमाफी योजनेतील सर्व ८९ लाख शेतकऱ्यांची यादी तपासून घेण्याची वल्गना शिवसेनेने केली होती, त्यानंतर बँकांसमोर ढोल बडवण्याची भाषाही केली होती, पण प्रत्यक्षात अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शिवसेनेला कोणीही गांभीर्याने घेत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती

पीक विम्याचा लाभ देताना बँकांकडून शेतकऱ्यांची होणाऱ्या फसवणुकीबाबत इशारा मोर्चा काढण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर सरकारने तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीमध्ये गटविकास, मंडल कृषी आधिकारी, शेतकऱ्यांचे दोन प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा आणि अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्याचे काम ही समिती करणार आहे.