नगरसाठी काँग्रेस आग्रही

जागांच्या आदलाबदलीत काँग्रेसकडे असलेल्या पुणे आणि औरंगाबाद या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. नगरची जागा काँग्रेसला हवी असल्याने या बदल्यात दोन्ही किंवा एक मतदारसंघ काँग्रेस सोडण्याची चिन्हे आहेत.

पुण्यातून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे. स्वत: पवार यांनी लोकसभा लढणार नाही, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र मतदारसंघाचा कौल किंवा सर्वेक्षणाच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. पवारांनी निवडणूक लढविल्यास चित्र कसे असेल याची चाचपणी सध्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. पुण्यात काँग्रेसकडे तेवढा प्रभावी उमेदवार नाही, असाही राष्ट्रवादीचा युक्तिवाद आहे. पुणे जिल्ह्य़ातील चारपैकी बारामती, शिरुर आणि मावळ हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. पुणे मतदारसंघ सोडल्यास जिल्ह्य़ात काँग्रेसकडे एकही मतदारसंघ उरणार नाही. मावळ किंवा शिरुरमध्ये काँग्रेसचा टिकाव लागणार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद मतदारसंघ हा काँग्रेसकडे असला तरी १९९८चा अपवादवगळता काँग्रेसने या मतदारसंघात कधीच विजय मिळविलेला नाही. १९९९ पासून प्रत्येक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेसकडे या मतदारसंघात प्रबळ किंवा छाप पाडू शकेल, असा उमेदवार नाही, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. आमदार सतीश चव्हाण यांना रिंगणात उतरविण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.

नगर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असून, या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांनी केली आहे. विखे-पाटील यांना हा मतदारसंघ हवा आहे. पण शरद पवार आणि विखे-पाटील यांचे जुने कटुतेचे संबंध लक्षात घेता राष्ट्रवादी सहजासहजी हा मतदारसंघ सोडणार नाही. नगरमध्ये राष्ट्रवादीकडे तेवढा तगडा उमेदवारही नाही.

पुणे किंवा औरंगाबादच्या बदल्यात नगरची जागा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास विरोध आहे.

यवतमाळच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी या मतदारसंघात दौरे करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच पुसदवगळता राष्ट्रवादीचा अन्यत्र फार काही प्रभाव नाही. यामुळे यवतमाळ राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेस तयार नाही. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव आहे. पण त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.   अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष