उस्मानाबाद-लातूर-बीडमधून उमेदवारी जाहीर, काँग्रेसही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत

विधान परिषद निवडणुकीत आघाडीत वादाचा मतदारसंघ ठरलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीडमधून उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसने  काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. नाशिक  आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारही राष्ट्रवादीने निश्चित केले आहेत. परभणीची जागाही लढविणार असल्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अद्याप कोणत्याही प्रकारची आघाडी झाली नाही, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लातूर मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली असली, तरी काँग्रेसनेही ही जागा लढविण्याची तयारी केली असून,  पक्षाचा अधिकृत उमेदवार उद्या जाहीर करून उमेदवारी अर्जही भरला जाईल, असे पक्षातील सूत्राकडून सांगण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर, नाशिक, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक संस्था मतदारसंघातून ही निवडणूक होत आहे. या सहापैकी सध्या लातूर काँग्रेसकडे, परभणी, नाशिक व रायगड हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणि अमरावती व चंद्रपूर हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत.

राज्यात २०१५ नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर, या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचे ठरविले. परंतु जागा वाटपावरून वाद सुरू झाला. काँग्रेसने तीन जागा देण्याची मागणी केली. तर, राष्ट्रवादीने त्यांच्या विद्यमान आमदार असलेल्या तीन जागांसह लातूरवरही दावा सांगितला. त्यामुळे आघाडीत बिघाड निर्माण झाला. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या ३ मे ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे आघाडीच्या चर्चेच्या गुऱ्हाळात न अडकता राष्ट्रवादी काँग्रेसने लातूर व नाशिकमधील उमेदवार जाहीर केले. त्यानंतर लगेचच लातूरमधून रमेश कराड आणि नाशिकमधून अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

रायगडमधून अनिकेत तटकरे

रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल तटकरे यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच निवड झालेले सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन विद्यमान आणि एक लातूरची जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार परभणीचीही जागा पक्ष लढविणार आहे, असे त्यांनी सांगितले. लातूरमध्ये पक्षाची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे आम्ही ती जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.