News Flash

गुरुदासपूरमधील विजयाने काँग्रेसला उभारी!

बदलांचे वारे वाहू लागले

पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदासंघातून काँग्रेसच्या सुनील जाखड यांनी रविवारी विजय मिळवल्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री नवज्योसिंग सिद्धू व इतरांनी जल्लोष केला. 

नांदेड महानगरपालिकेपाठोपाठ गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात मिळालेले एकतर्फी विजय, दिल्ली विद्यापीठ निवडणुकांमध्ये मिळालेले यश, गेल्या सहा महिन्यांमध्ये काँग्रेस किंवा मित्रपक्षाने जिंकलेल्या लोकसभेच्या चार मतदारसंघांतील पोटनिवडणुका यातून पराभवाची मालिका खंडित होऊ लागल्याने काँग्रेसला साहजिकच उभारी मिळाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे बदलांचे वारे असल्याची प्रतिक्रियाच काँग्रेसने व्यक्त केली आहे.

भाजपचे विनोद खन्ना यांनी प्रतिनिधित्व केलेल्या पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड हे १ लाख ९३ हजार एवढय़ा विक्रमी मतांनी विजयी झाले. सुनील जाखड हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचे पुत्र असून ते पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले होते. अमृतसरपाठोपाठ गुरुदासपूरची जागा जिंकल्याने पंजाबमध्ये काँग्रेसची पाळेमुळे घट्ट झाल्याचे मानले जाते.

केरळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसप्रणीत आघाडीतील मुस्लीम लीगच्या उमेदवाराने जागा कायम राखली. केरळात भाजपने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यावर पद्धतशीरपणे भर दिला आहे, म्हणूनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाचारण करण्यात आले होते. मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपच्या मतांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या तुलनेत सात हजार मतांनी घट झाली आहे.

चारच दिवसांपूर्वी नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ८१ पैकी ७३ जागा जिंकून एकतर्फी यश संपादन केले होते. नांदेडच्या यशाला काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी दिली. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाचा मुद्दा भाजपने राष्ट्रीय पातळीवर नेला होता, म्हणूनच काँग्रेसने नांदेडच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला प्रत्युत्तर दिले.

गेल्याच महिन्यात दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणीत एन.एस.यू.आय.ला यश मिळाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली. पंजाब आणि पुण्डेचरीचा अपवाद वगळता सत्ता मिळाली नाही. गोवा किंवा मणिपूरमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. आर्थिक आघाडीवरील अपयश, नोटाबंदीनंतरही चलनात होत्या तेवढय़ाच जमा झालेल्या नोटा, वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) व्यापाऱ्यांमध्ये पसरलेली नाराजी, बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण हे सारे घटक सत्ताधारी भाजपसाठी प्रतिकूल ठरू लागले आहेत.

बदलांचे वारे वाहू लागले – सुरजेवाला

श्रीनगर, अमृतसर, मल्लपूरमपाठोपाठ गुरुदासपूर या लोकसभेच्या चार मतदारसंघांतील पोटनिवडणूक गेल्या सहा महिन्यांमध्ये काँग्रेस किंवा यूपीएच्या घटक पक्षांनी जिंकल्या आहेत. पंजाबमधील गुरुदासपूरची जागा पोटनिवडणुकीतही भाजपला कायम राखता आलेली नाही. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये मतदारांनी काँग्रेसवर संपूर्ण विश्वास व्यक्त केला. विविध विद्यापीठांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणीत अभाविपचा झालेला पराभव हे सारेच देशात बदलांचे वारे वाहू लागल्याचे स्पष्ट संकेत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल. गुजरातची निवडणूक जाहीर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगावर दबाव आणण्यात आला. यावरून गुजरात भाजपसाठी सोपे नाही हाच संदेश जातो, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2017 1:31 am

Web Title: congress party won in gurdaspur by election
Next Stories
1 फेरीवालामुक्त रस्ते धोरण कागदावरच
2 फुटीच्या धास्तीने काँग्रेस सावध
3 बॉलीवुडच्या जाळ्यात फसू नका!
Just Now!
X