पाकिस्तानी कलाकार व राजकारण्यांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असतानाच महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या नथुराम गोडसे याच्या पुण्यतिथीनिमित्त १५ नोव्हेंबरला अखिल भारतीय हिंदू महासभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर राज्य सरकारने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केली आहे. भाजप सरकारने कार्यक्रमाला परवानगी दिल्यास काँग्रेस हे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
गोडसे याला फाशी दिली तो दिवस बलिदानदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा हिंदू महासभेने केली असून, राज्यभर हा दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या फाशीदिनाच्या कार्यक्रमाला भाजप सरकार परवानगी देणार का, असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या जेस्म लेनला पुस्तक लिहिण्यास मदत करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भाजप सरकारने अलीकडेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केला. भाजप सरकारच्या काळात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण सुरू झाले आहे. भाजप सरकारने वेळीच याला आळा घालावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली आहे.