मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत आहे. या दरवाढीविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी एकाच वेळी राज्यातील एक हजार पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारने इंधन दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा  काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

प्रदेश काँग्रेसच्या वतीने राजभर इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष पटोले, तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील वडसा येथील पेट्रोल पंपावरील आंदोलनात सहभाग घेतला.  करोनाने दीड वर्षांपासून लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, उद्योगधंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ व महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंग यांनी इंधनाच्या महागाईची झळ बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता.

ठाणे येथे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत शिंदे, रवींद्र आंग्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील ३५ पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांंनी निदर्शने केली. कसबा विधानसभा मतदारसंघात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक, सांगली, अहमदनगर, नांदेड, मालवण, अमरावती, सावंतवाडी, कणकवली, बुलढाणा, नांदेड, औरंगाबाद यासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.