News Flash

२२ जागांसाठी राष्ट्रवादीला आधार कोणता?

काँग्रेस २६ आणि राष्ट्रवादी २२ या सूत्रानुसारच जागावाटप निश्चित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले असले तरी या वाटपास

| October 28, 2013 01:20 am

काँग्रेस २६ आणि राष्ट्रवादी २२ या सूत्रानुसारच जागावाटप निश्चित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले असले तरी या वाटपास आधार काय, असा सवाल करीत, आधी चर्चा व्हावी मगच संख्याबळ ठरवू, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी मांडली.
साताऱ्यातील मेळाव्यात गेल्या वेळप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीत २६-२२ जागांचे सूत्र असेल, असे अजित पवारांनी जाहीर केले होते. यापूर्वी २००४ आणि २००९ मध्ये चर्चा करून मगच संख्या व मतदारसंघ निश्चित करण्यात आले होते. तेव्हा चर्चा करणाऱ्या राष्ट्रवादीला आता चर्चा का नको, असा सवालही ठाकरे यांनी केला. मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित  सोशल मीडिया संदर्भातील कार्यक्रमानंतर बोलताना ठाकरे यांनी राष्ट्रवादीलाच लक्ष्य केले. २००४ मध्ये काँग्रेसने २७ तर राष्ट्रवादीने २१ जागा लढविल्या होत्या. विधानसभेकरिता काँग्रेसला १६४ तर राष्ट्रवादीला १२४ जागा सोडण्यात आल्या होत्या. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत २६-२२ असे जागावाटप झाले तरी सहा महिन्याने लोकसभा निकालाच्या आधारे काँग्रेसच्या वाटय़ाला जास्त जागा आल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला १७४ तर राष्ट्रवादीला ११४ जागा मिळाल्या होत्या. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता या वेळीही जागावाटपाच्या संदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीला तेवढय़ा जागा सोडणे योग्य होणार नाही. उभय बाजूने चर्चेत जागा लढविण्याकरिता आधार ठरवावा लागेल. ही चर्चा होण्यापूर्वीच बाहेर जाहीर सभांमध्ये संख्याबळ निश्चित झाले हे कशाच्या आधारे राष्ट्रवादीचे नेते जाहीर करतात हे समजत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. जागावाटप झाल्याचा दावा केला जात असला तरी आम्ही आमची बाजू दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे. राष्ट्रवादीचे नेते भीतीने जागावाटप झाले हे जाहीर करीत नाही ना, अशी शंकाही ठाकरे यांनी उपस्थित केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 1:20 am

Web Title: congress questions ncp in which base demands for 22 seats in lok sabha election
Next Stories
1 चार माजी मुख्यमंत्र्यांच्या चार तऱ्हा
2 अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओमध्ये तोडफोड
3 पवारांचे राहुल गांधींबाबतचे मत निवडणुकीनंतर बदलेल
Just Now!
X