पालघरमध्ये पाचव्या क्रमांकावर तर भंडारा-गोंदियात ‘मैत्री’ आड आली

मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्नशील असणाऱ्या काँग्रेसला राज्यातील पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला आहे. पालघरमध्ये काँग्रेस पक्ष पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आणि अनामतही जप्त झाली.

राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका मतदारसंघात विजय मिळाला. पालघरमध्ये शिवसेनेने चांगली लढत दिली आणि सेनेला मतेही चांगली मिळाली. या तीन पक्षांच्या तुलनेत काँग्रेसची अवस्था बिकट झाली. आताच्या पालघर आणि पूर्वीच्या डहाणू मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी खासदार दामू बारकू शिंगडा हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. काँग्रेसपेक्षा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसचे उमेदवार शिंगडा यांची अनामतही जप्त झाली. शिंगडा यांनी निवडणूक अजिबात गांभीर्याने घेतली नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे झेंडे वा बॅनर्स कोठे दिसले नाहीत. निवडणुकीसाठी खर्च कोणी करायचा हा पक्षात प्रश्न होता. प्रदेश पातळीवरून हात आखडता घेण्यात आला तसेच उमेदवाराने हात वर केले. परिणामी काँग्रेसचे नुकसान झाले.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची पारंपरिक मते उमेदवाराला मिळाली. या तुलनेत चार वेळा खासदारकी भूषविलेल्या शिंगडा यांना ५० हजारही मते मिळाली नाहीत. काँग्रेसची पारंपरिक मतेही पक्षाच्या उमेदवाराला मिळाली नाहीत. वसईतील ख्रिश्चन समाजाची मते भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली. आदिवासी पट्टय़ात पूर्वी काँग्रेसची पारंपरिक व हक्काची मते होती.

भंडारा-गोंदियामध्ये नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक झाली. पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी, असा पक्षाचा प्रयत्न होता. पण राष्ट्रवादी किंवा प्रफुल्ल पटेल यांनी जागा सोडण्यास नकार दिला. मित्रपक्षांना सांभाळून घेण्यावर सध्या राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे धोरण आहे. यामुळेच नाना पटोले यांच्यासाठी हा मतदारसंघ मिळावा हा मुद्दा काँग्रेसने दिल्लीत प्रतिष्ठेचा केला नाही. तीन वेळा भाजपची आमदारकी भूषविलेले व नंतर राष्ट्रवादीत सहभागी झालेले मधुकर कुकडे हे निवडून येतात, मग नाना पटोले हे सहजपणे निवडून आले असते, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.