आरे वसाहतीतील मेट्रो कारशेड;  शिवसेनेसह काँग्रेसचाही विरोध

आरे वसाहतीमधील मौजे प्रजापूर आणि मौजे वेरावली येथील ‘ना विकास क्षेत्रा’तील भूखंड मुंबईच्या २०१४-३४ च्या सुधारित विकास आराखडय़ामध्ये मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरक्षित करण्यात आला असून या भूखंडाच्या आरक्षण बदलास मंजुरी मिळावी म्हणून त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्यात येणार आहे; मात्र त्यास शिवसेनेबरोबरच काँग्रेसनेही विरोध केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पातील कारशेड आरे वसाहतीमध्ये उभारता यावी यासाठी या प्रकल्पास मंजुरी मिळावी म्हणून भाजपची धडपड सुरू आहे.

आरे वसाहतीमधील मौजे प्रजापूर आणि मौजे वेरावली येथील सुमारे ३३ हेक्टर जागा ‘ना विकास वापर’ विभागातून वगळून मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आली आहे. आरे वसाहतीमध्ये कारशेड उभारण्यात आली, तर तेथील वृक्षसंपदा नष्ट होईल. त्याचा पर्यावरणावरही परिणाम होऊ शकेल, अशी भीती व्यक्त करीत शिवसेनेने आरे वसाहतीमध्ये कारशेड उभारण्यास यापूर्वीच कडाडून विरोध केला होता. असे असतानाही मुंबईच्या २०१४-३४ या काळातील विकास आराखडय़ाच्या मसुद्यामध्ये आरे वसाहतीमधील मौजे प्रजापूर व मौजे वेरावली येथील भूखंड मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आला होता. ‘ना विकास क्षेत्रा’त मोडणारा हा भूखंड ४५.७० मीटर रुंद रस्त्याने बाधित आहे. मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यापूर्वी या संदर्भात संबंधित सर्व प्राधिकरणे आणि विभागांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे मौजे प्रजापूर आणि मौजे वेरावली येथील आरक्षणात बदल करण्यासाठी परवानगी मिळावी याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या ११ मे रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

सुधार समितीच्या पुढील बैठकीच्या कामकाजात या प्रस्तावाचा समावेश करण्यात आला असून आरे वसाहतीमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यात आल्यास तेथील वृक्षसंपदा नष्ट होईल. त्यामुळे या प्रस्तावाला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात येईल, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

भाजप एकाकी?

मुंबईत होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी  प्रकल्प म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आरे वसाहतीमधील मौजे प्रजापूर आणि मौजे वेरावली येथील आरक्षण बदलण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. मात्र आरे वसाहतीमध्ये मेट्रोसाठी कारशेड बांधण्यास शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. आता काँग्रेसनेही त्यास विरोध दर्शविला आहे. सुधार समितीमध्ये शिवसेनेबरोबरच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता असून भाजप एकाकी पडण्याची चिन्हे आहेत.