सेनेचे राजकारण आणि राष्ट्रवादीच्या हेतूबद्दल शंका; सरकार स्थापण्याबाबत सावधगिरी

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शिवसेनेचे एकूण राजकारण आणि राष्ट्रवादीच्या हेतूबद्दल काँग्रेसमध्ये अजूनही साशंकता दिसते. त्यामुळे कोणतीही घाई न करता सावधगिरी बाळगण्याचे काँग्रेसचे धोरण आहे. तसेच सरकार स्थापण्याचा निर्णय आता दिल्लीच्या पातळीवरच घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत.

सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्या. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सविस्तर चर्चाही केली. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करून तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडे पाठविण्यात आला. किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले तरच पुढील चर्चा सुरू होऊ शकते, पण तिन्ही पक्षांमधील परस्परांबद्दलची संशयाची भावना कमी झालेली नाही.

शिवसेनेला साथ देण्याबाबत काँग्रेसमध्ये अजूनही एकमत झालेले नाही. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मनात अजूनही अढी आहे. शिवसेनेला साथ दिल्यास अल्पसंख्याक समाज नाराज होईल, अशी भीती काँग्रेसला आहे. त्याच वेळी मुस्लीम समाजाच्या राष्ट्रीय पातळीवरील काही संघटनांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेशी युती करण्यास अनुकूलता दर्शविली असली तरी मुंबईतील काही मुस्लीम संघटनांनी शिवसेनेबरोबर सत्तेत भागीदारी करू नये, अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेस आमदारांच्या दबावामुळेच शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण शिवसेनेला साथ दिल्यास होणाऱ्या परिणामांची सोनिया गांधी यांना जास्त भीती असल्याचे सांगण्यात येते.

किमान समान कार्यक्रम तयार करताना हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार शिवसेनेने करू नये, अशी भूमिका दोन्ही काँग्रेसने मांडली असता, शिवसेनेच्या नेत्यांनी त्याला होकार दिला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत जाण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर ठाकरे अयोध्येला गेल्यास काँग्रेसचे नाक कापले जाईल, असे काही काँग्रेस नेत्यांना वाटते. केरळमधील काँग्रेस नेत्यांनी तर शिवसेनेला साथ देण्यास विरोध दर्शविला आहे. राहुल गांधी मुस्लीमबहुल वायनाड मतदारसंघातून निवडून आले आहेत याकडेही  काँग्रेस नेते लक्ष वेधतात.

शिवसेनेला पाच वर्षांसाठी पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादीने जाहीर केली, पण शिवसेनेपेक्षा फक्त दोन आमदार कमी असताना, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर दावा करावा, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेवरही काँग्रेसमध्ये संशय निर्माण झाला आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भात राज्यातील नेत्यांकडून माहिती घेतली. राष्ट्रवादी अडीच वर्षांकरिता मुख्यमंत्री पदाचा दावा करणार असल्यास आपले नुकसान होईल, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यात काही बाबी स्पष्ट होतील. सोनिया गांधी सावधगिरीने निर्णय घेतील, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते. काँग्रेसला सत्तेत योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशी अनेक नेत्यांची अपेक्षा आहे.

सत्तावाटपानंतरच सरकार स्थापण्याचा निर्णय – पृथ्वीराज

किमान समान कार्यक्रम आणि सत्तेचे वाटप याचा निर्णय झाल्याशिवाय राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मसुदा तयार केला आहे. त्याला काँग्रेस पक्षाध्यक्षांची मान्यता घेतली जाईल. सोनिया गांधी शरद पवार यांच्याशी चर्चा करतील मगच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पाच वर्षे टिकणारे सरकार लवकरच – शरद पवार

नागपूर : भाजपसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि ते पाच वर्षे टिकेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने त्याची पाहणी करण्यासाठी पवार नागपूर जिल्ह्य़ाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी चर्चा सुरू आहे काय, या प्रश्नावर पवार म्हणाले, शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कोणाशीही चर्चा सुरू नाही. राज्यात स्थिर सरकार असावे आणि राज्यातील यक्षप्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी व्हावे, असे आम्हाला वाटते. परंतु ते सरकार आज किंवा उद्या स्थापन होईल, असे मी सांगू शकत नाही. मात्र राज्यासाठी जे काही योग्य असेल ते करण्याची आमची इच्छा आहे.