सेनेचा दिल्लीतील नवा चेहरा; राज्यसभेचे आश्वासन?

मुंबई : पत्रकार परिषदेत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या आठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात घेतल्याने उद्विग्न झालेल्या काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचा दिल्लीतील चेहरा म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येणार असून, त्यांना राज्यसभेच्या खासदारकीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी एका पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेसच्या आठ पदाधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केल्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सरचिटणीस आणि पूर्व-उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या शिफारशीवरून त्यांना पुन्हा पक्षात दाखल करून घेण्यात आले. त्याबद्दल प्रियंका यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

पक्षासाठी घाम गाळणाऱ्या आणि रक्त आटवणाऱ्यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही, गुंडांना मात्र मान मिळतो, अशा आशयाचे ट्वीट करून चतुर्वेदी यांनी पक्षापासून फारकत घेण्याचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी राजीनामा दिला आणि त्या शुक्रवारी शिवसेनेच्या तंबूत दाखल झाल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. त्यांच्या रूपाने आपल्याला चांगली बहीण मिळाली असून त्यांच्या बुद्धीचा देशाला आणि महाराष्ट्रास उपयोग होईल, असेही ते म्हणाले, तर मुंबई ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून लहानपणापासूनच आपल्याला शिवसेनेविषयी आत्मीयता आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

महिलांच्या हक्कांसाठी आपल्याला माध्यमातून काम करावयाचे असून त्यासाठी शिवसेना हाच योग्य पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

उत्तर प्रदेशातील काही कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचे कारण देत प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असला तरी लोकसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्या नाराज होत्या. त्यातच दिल्लीत पक्ष पातळीवर त्यांचे महत्त्व गेल्या काही दिवसांपासून कमी करण्यात आले होते.

 

राज्यसभेचे आश्वासन?

शिवसेनेचा दिल्लीतील चेहरा म्हणून संजय राऊत हे ओळखले जात होते. प्रियंका चतुर्वेदी यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेचा दिल्लीतील चेहरा म्हणून त्यांना पुढे आणले जाईल, अशी चिन्हे आहेत. चतुर्वेदी यांच्याकडे त्यांच्या कुवतीनुसार महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल, असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यसभेच्या खासदारकीचे त्यांना आश्वासन देण्यात आल्याचे समजते. यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुकेश पटेल, चंद्रिका केनिया, प्रितीश नंदी, सुरेश केशवानी, भारतकुमार राऊत या शिवसेनेशी काहीही संबंध नसलेल्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता दिल्लीतील चेहरा म्हणून चतुर्वेदी यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.

मला शिवसेनेबद्दल सुरुवातीपासूनच सहानुभूती होती. पक्षात कोणतीही अट न घालता प्रवेश केला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन. दिल्ली वा मुंबई कोठेही काम करायला आवडेल.       – प्रियंका चतुर्वेदी