नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेचे वरून कीर्तन आणि आतून तमाशा सुरू आहे. कोकणातील लोक विकासाविरोधात आहेत, असे सरकारकडून भासवले जात आहे. पण त्यांचा उद्देश सफल करू द्यायचा नाही. या प्रकल्पामुळे कोकणातील शेतकरी उद्धवस्त होणार आहे. लोकांच्या घरावरून कोणत्याही परिस्थितीत नांगर फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारला दिला. यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांवर टीका केली.
नाणार प्रकल्पाविरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ आज (दि.२ मे) कोकणात गेले होते. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेस या सरकारची कोणत्याही परिस्थितीत दंडेलशाही चालू देणार नाही. लोकांच्या काय भावना आहेत, हे आम्ही जाणतो. महाराष्ट्रात सगळीकडे शेतकरी आत्महत्या झाल्या. पण कोकणात एकही आत्महत्या झालेली नाही. पण सरकारने जर आमचे ऐकले नाही, उद्या सर्व काही टोकाला गेले तर कोकणातला माणूसही आत्महत्या करेन. बहुमत आहे, म्हणून कोणाकडे पाहायचं नाही, असे या सरकारचे सुरू आहे. अत्यंत असंवेदनशील सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे येथे येऊन मेळावा घेऊन गेले. इथल्या लोकांना सांगितले की रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही म्हणून आणि मुंबईला जाऊन ते काहीच करत नाहीत. हे सरकारमधून बाहेरही पडत नाही. आम्ही सरकारकडून करण्यात येणारी दंडेलशाही चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 3:24 pm