नवी दिल्ली:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली असली तरी, पक्षश्रेष्ठींनी पक्षाध्यक्ष बदलाबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. ‘यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. मंत्रिपद, विधिमंडळ नेतेपद, प्रदेशाध्यक्षपद अशा माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या असून कामाचे वाटप केले गेले पाहिजे,’ असे सांगत थोरात यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

दिल्लीत संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल व प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी राज्यातील काँग्रेस मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांना पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दिली. ‘राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी चमकदार चेहरा मिळेल,’ असे प्रभारी पाटील यांनी म्हणाले. पण, हा नवा चेहरा कधी निवडला जाईल हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवले.