केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला धोरण लकवा झाला आहे, अचानकपणे घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे, अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली. कांदा निर्यातबंदी ताबडतोब उठवावी, या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

करोना साथरोगामुळे जगभरात टाळेबंदीची परिस्थिती असताना शेतात खपून मोठय़ा कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ४ जून रोजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती. मग तीन महिन्यांत निर्णय का फिरवला, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ते व्यवस्थित अंमलबजावणी करू शकत नाहीत, नरेंद्र मोदी सरकारला धोरण लकवा झालेला आहे.