प्रत्येक मतदारसंघातून तीन नावे पाठविणार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया काँग्रेसने सुरू  केली आहे. दोन दिवस पार पडलेल्या प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत २८८ पैकी २२६ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

प्रत्येक मतदारसंघातून अंतिम निवडीसाठी तीन उमेदवारांची नावे पक्षाच्या केंद्रीय निवड समितीकडे पाठविली जाणार आहेत.

काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे ठरविले आहे. या पूर्वी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीबाबत तसेच जागावाटपाबाबत बैठका झाल्या आहेत. मात्र प्रदेश काँग्रेसने आता विधानसभेच्या सर्वच मतदारसंघांतील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.  निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरातून सुमारे ११०० अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी व बुधवारी संसदीय मंडळाची बैठक झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, अविनाश पांडे, राजीव सातव, विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड आदी नेते उपस्थित होते.

मंगळवारी झालेल्या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील ४७, विदर्भातील ६२ व मराठवाडय़ातील ४६ अशा एकूण १५५ मतदारसंघांतील उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. बुधवारी मुंबईसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांतील उमेदवार निवडीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र पूरस्थितीमुळे सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्य़ांतील मतदारसंघांतील चर्चा प्रलंबित ठेवण्यात आली.

पुणे व सोलापूर जिल्ह्य़ांतील मतदारसंघांतील उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील चर्चाही प्रलंबित राहिली, असे सांगण्यात आले.