भाजपच्या आर्थिक धोरणावर काँग्रेसची टीका

मुंबई : भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून देशात मंदीची लाट आली असून, त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील अनेक उद्योग बंद पडले आहेत. ‘मेक इन इंडिया’ची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मोठय़ा प्रमाणावर उद्योगांना टाळे ठोकले गेले, त्यासाठी कुलपांचे उत्पादन वाढले, अशी उपरोधिक टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी केली.

महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीनिशी उतरेल आणि राजकीय परिवर्तन घडवून आणेल, असा दावा प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. वल्लभ यांनी केला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात भयंकर मंदी आली आहे. कृषी, ऑटो उत्पादन क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांना मंदीचा मोठा फटका बसला असून लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरात हजारो कंपन्यांना टाळे लागले आहेत. मेक इन इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारच्या काळात फक्त कुलूप बनवणाऱ्या कंपन्याचे उत्पादन वाढल्याचे दिसत आहे, अशी  टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेकडून एक लाख ७६ हजार कोटी रुपये घेतले; पण त्या पैशाचे काय करणार हे सांगितले जात नाही. मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमातून ३० लाख नवीन रोजगार देऊ , असे सरकारने सांगितले होते; पण प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले, त्याची माहिती दिली जात नाही. सरकारने केलेल्या दाव्यानुसार राज्यात ७३ लाख नवीन रोजगारांची निर्मिती व्हायला हवी होती; पण या सरकारच्या काळात नवीन रोजगारनिर्मिती होण्याऐवजी असलेले रोजगार जात आहेत. २००८ मध्येही जागतिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात मंदीचे वातावरण होते. त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे योग्य नेतृत्व होते, त्यामुळे देशाला त्या मंदीचा फटका बसला नाही आणि अर्थव्यवस्था त्यातून सावरल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष महाराष्ट्र, हरयाणा व झारखंडमधील निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार असून आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांची दुरवस्था हे मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे. या तिन्ही राज्यांत सत्ताबदल होऊन पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.