चिक्की खरेदीसह गैरव्यवहाराचे आणि खोटेपणाचे आरोप झालेल्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेतही लक्ष्य केले. चौकशीआधीच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने  दोषमुक्त ठरवल्याचा आरोप केला. स्वच्छ व पारदर्शी कारभारातून ‘रामराज्य’ साकारण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांचे करोडो रुपयांचे गैरव्यवहार उघड होत असल्याने डोळे पांढरे होण्याची वेळ आली असून नऊ महिन्यांमध्येच जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचा भ्रमनिरास झाला आहे, असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केला.
मंत्र्यांच्या गैरव्यवहारांच्या आणि खोटी माहिती देण्याची प्रकरणे व बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती या मुद्दय़ांवर विरोधी पक्षांनी दिलेल्या अंतिम आठवडा चर्चेत विरोधी पक्षनेते विखेपाटील यांनी मंत्र्यांवर तोफ डागतानाच मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आणि ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ असा सवाल करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण विभागाने खरेदी केलेल्या चिक्कीचा दर्जा निकृष्ट असून त्यात भेसळ आहे. असा आरोप करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अभियांत्रिकी पदवीचे प्रकरण, पुस्तक खरेदी, अर्थविभागाने रोखलेली अग्निशमन यंत्रांची खरेदी आदी प्रकरणांमध्ये मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.
फडणवीस हे पारदर्शी कारभाराचे दाखले देत असताना आधी चौकशी तर करावी, असे आव्हान देत जयंत पाटील यांनी पुराव्यांची सर्व कागदपत्रे देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.