विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याकरिता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चाचपणी सुरू केली असून, विजयाकरिता मतांचे गणित जुळणार असले तरच ते निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येते.

नक्की वाचा :- नारायण राणे यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट होणार’

विधानसभा निवडणुकीत कुडाळ या बालेकिल्ल्यात, तर वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक असे दोन लागोपाठ पराभव शिवसेनेकडून स्वीकारावे लागल्याने राणे यांनी सावध भूमिका घेतली आहे. मतांचे गणित जुळणार असेल तरच रिंगणात उतरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबई महानगरपालिकेतून विधान परिषदेवर दोन जण निवडून येतात. ही निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. विजयाकरिता पहिल्या फेरीत ७५च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे ५० नगरसेवक आहेत. काँग्रेसला विजयाकरिता अतिरिक्त २५ मतांची आवश्यकता आहे. मनसेने साथ दिल्यास राणे यांना सहजपणे विजय प्राप्त होऊ शकतो. मध्यंतरी राणे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडे आवश्यक संख्याबळापेक्षा जास्त मते असल्याने सेना उमेदवाराला निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही.

गुप्त मतदान असल्याने या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजयाचे गणित जुळणार असेल तरच राणे रिंगणात उतरतील, असे सांगण्यात आले. लोकांनी लागोपाठ दोनदा नाकारल्याने आता विधान परिषदेचा मार्ग पत्करण्याचा राणे यांचा प्रयत्न आहे. राणे यांच्या उमेदवारीबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना विचारले असता त्यांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला.